कोपरगाव : 29 ग्रामपंचायतींसाठी 82.18 टक्के मतदान

611 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदः मतदान प्रक्रिया शांततेत
कोपरगाव : 29 ग्रामपंचायतींसाठी 82.18 टक्के मतदान

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या 272 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 611 उमेदवारांचे राजकीय भवितव्य 52 हजार 493 मतदारांनी

बोटाला शाई लावून मतदान यंत्रात बंद केले आहे. मतदानाची वेळ संपली तेंव्हा तालुक्यातील 82.18 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली .

निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करणे , 4 जानेवारी 2021 उमेदवारी अर्ज मागे घेणे, 15 जानेवारी प्रत्यक्ष मतदान आणि 18 जानेवारी निकाल असा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.

निवडणुका जाहीर झालेल्या 29 ग्रामपंचायतींपैकी 7 उमेदवार बिनविरोध झाल्याने आज 29 ग्रामपंचायतींच्या 272 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. याकरिता 611 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. एकूण मतदार संख्या 63 हजार 872 असून पुरुष मतदार 32 हजार 887 तर स्री मतदार 30 हजार 985 आहेत . पैकी 52 हजार 493 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यात पुरुष 27 हजार 463 स्त्रीया 32 हजार 503 मतदार यांचा समावेश आहे. आज सकाळी 7.30 वाजता 29 ग्रामपंचायतींच्या 111 मतदान केंद्रांवर शांततेत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची बर्‍यापैकी गर्दी झाल्याचे चित्र होते. मात्र दुपारी मतदान केंद्रावरील गर्दी काहीशी रोडावली होती .

सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत सहा तासांत 52.06 टक्के मतदान झाले होते. यात पुरूष 17247 (52.44 टक्के ) स्त्रिया 16 हजार 006 ( 51.66 टक्के) एकूण 33 हजार 253 ( 52.06 टक्के ) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत दोन तासांत 18.16 टक्के मतदान झाले होते. यात पुरूष 5 हजार 699 (49 .30 टक्के) स्त्रिया 5 हजार 902 (51.06 टक्के ) एकूण 11 हजार 601 (18.16 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण मतदान 70.22 टक्के झाले होते. तर साडे तीन ते पाच पर्यंत या शेवटच्या टप्प्यात 11.9 6 टक्के मतदान झाले होते. यात पुरूष 4 हजार 517 ( 50.9 0 टक्के ) स्त्रिया 3 हजार 122 ( 40.10 टक्के) एकूण 7 हजार 639 ( 11.9 6 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने 82.18 टक्के मतदान झाले.

निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, माधवी गोरे, मनीषा कुलकर्णी, अरुण रणनवरे, यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोनि. दौलतराव जाधव, पोनि.प्रविण लोखंडे, स्पेशल नेमणूक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रक्रिया सुलभतेने होणे कामी विशेष लक्ष ठेवून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com