कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत होणार

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत होणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 18 डिसेंबरला होणार असून त्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका दुरंगी होण्याची चिन्हे आहेत.उमेदवारांची कागदपत्रे जुळवाजुळव करण्याचे काम सध्या तालुक्यात वेगात सुरू आहे. बैठकांना आणी गाठीभेटीला वेग आला आहे. भर थंडीतही निवडणुकीचे वातावरण तापले आहे. बहुंताश ग्रामपंचायतींत काळे गट विरुध्द कोल्हे गट अशी लढत होईल तर काही ठिकाणी अपक्षही सरपंचपदासाठी नशीब आजमावणार आहेत.

तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. तालुक्यातील भोजडे, सडे, शिंगणापूर, वेस- सोयगाव, कोळपेवाडी, वडगाव, मोर्विस, खिर्डी गणेश, पढेगाव, चासनळी, माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, डाऊच बु., डाऊच खु., देर्डे- कोर्‍हाळे, तळेगाव मळे, चांदेकसारे, धारणगाव, हंडेवाडी, बत्तरपूर, सोनेवाडी, खोपडी, करंजी बु.,बहादरपूर यांचा समावेश आहे. तालुक्यात काळे गट, कोल्हे गट, परजणे गट, तसेच शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) असे गट आहेत. तर बहुतांश ठिकाणी काळे विरुध्द कोल्हे गटात लढतीचे चित्र आहेत.

28 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तर 7 डिसेंबरला अर्ज माघारी घेता येणार आहे.तर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.20डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. इच्छुकांची कागदपत्रे गोळा करण्याची गडबड सुरू आहे. अर्ज ऑनलाईन भरावयाचे असल्याने बारकाईने काळजी घेतली जात आहे. जातीचे दाखले काढण्यासाठी सरकारी कार्यालयात गर्दी वाढली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीच्या पट्ट्या भरून दाखले घेतले जात आहेत.

काही प्रामाणात ग्रामपंचायतीचा वसूल वाढणार आहे. उमेदवारीवरून रुसवेफुगवे गावोगाव सुरू झाले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने उमेदवारांना ताकद देण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळी युती व आघाडी होण्याची चिन्हे आहेत. तशी व्युहरचनाही सुरू आहेत. आम्हाला ग्रामपंचायत निवडणुका आमच्या पध्दतीने लढू द्या विधानसभेला आम्ही तुमचेच असे सांगून काही ठिकाणी वेगळ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com