कोपरगावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करावा - वहाडणे

कोपरगावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करावा - वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर गायी फिरत असताना आढळतात. 20-25 च्या समुहाने फिरणार्‍या या गायी अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. अशातच एखादी गाय उधळली तर अनेक गायी सैरावैरा पळायला लागतात व त्यातूनच अनेकदा अपघातही घडत असतात. यात अनेक नागरिक जायबंदी झालेले आहेत. या मोकाट गायींचा नगरपरिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कधीकधी याच गायी रस्त्यावरील कचरा, प्लास्टिक कॅरीबॅग खाऊन आजारी पडून त्यांचा जीव धोक्यात येतो. वाहनांची धडक बसून गायी-वासरे जखमी होतात. कधी कधी रात्रीच्या वेळी पाळत ठेवून गायी चोरून नेण्याचेही प्रकार घडलेले आहेत.

नगरपरिषदेने याआधी अशा फिरणार्‍या गायी पकडून गो शाळेतही नेऊन ठेवल्या, दंडही केला. तरीही गायींचे मालक गायी शहरात फ़िरायला सोडून देतात हे योग्य नाही. अनेकांच्या जीवावर बेतणारे आहे. तरी अशा गायींच्या मालकांनी आपापल्या गायी आपल्या घराजवळ व्यवस्थित बांधून ठेवून त्यांची काळजी घ्यावी. एकीकडे गायीला पवित्र गो माता म्हणायचे व तरीही निष्काळजीपणा करून बेजबाबदारपणे गायींचा व नागरिकांचा जीव धोक्यात आणायचा हे योग्य नाही, असे आवाहन विजय वहाडणे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com