ट्रामा केअर सेंटरचा ड्रामा करून करोना संकटाचा राजकीय आखाडा करू नये - अनुसयाताई होन

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

देशात दररोज हजारो करोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

यामध्ये दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. या जीवघेण्या संकटातून जनतेचा जीव वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. अशा परिस्थितीत तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी ट्रामा केअर सेंटरचा ड्रामा करून वैश्विक करोना संकटाचा राजकीय आखाडा करू नये, असा सल्ला पंचायत समितीच्या माजी सभापती अनुसयाताई होन यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना दिला आहे.

अनुसयाताई होन यांनी म्हटले आहे, आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या कमी झालेली असताना देखील कोव्हिड हॉस्पिटल सुरू ठेवले होते. 17 मार्च पासूनच आमदार आशुतोष काळे यांनी एस.एस. जी.एम. येथील कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. तसेच प्रशासनाला 350 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याबाबत दिलेल्या सुचनेनुसार आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वसतिगृहात 350 बेडचे सुसज्ज कोव्हिड केअर सेंटर सुरू होणार आहे.

आ.काळे प्रशासनाला हवी ती मदत करीत आहे याची जाणीव जनतेला आहे. मात्र माजी लोकप्रतिनिधींना नाही. दुर्दैवाने करोना बाधित झालेले रुग्ण हे आपल्याच तालुक्यातील व आपल्याच कुटुंबातील आहेत याची जाणीव ठेवा. त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पुढे यायचे सोडून आपण राजकारण करता हे चुकीचे आहे. राजकारण करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतील, मात्र जनतेचा जीव महत्त्वाचा आहे.

त्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या शालीन राजकारणाची परंपरा जपली नाही तरी चालेल मात्र जनता दुःखाचे चटके सहन करीत असताना त्यांच्या वेदनांशी खेळू नका, असे आवाहन अनुसयाताई होन यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना केले आहे.

नेत्याची निष्क्रियता झाकण्यासाठी राजकीय रंग देऊ नका : माजी उपसभापती वैशाली साळुंके

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात करोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक वाढणार्या रुग्णसंख्येने जनता भयभीत झाली,

उपचाराअभावी रुग्णांचे मानसिक व आर्थीक खच्चीकरण होत असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. ही वस्तुस्थिती असताना लोकप्रतिनिधींना कर्तव्याची जाणीव करून दिली असता त्यास राजकीय रंग देऊन आपल्या नेत्याची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी टीका माजी उपसभापती वैशाली साळुंके यांनी केली.

देशासह राज्यात करोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. कोपरगावातही दर दिवशी करोनाबाधितांचा आकडा वाढता आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वाढत्या करोना आकड्यांपुढे तालुक्यातील करोना प्रतिबंधात्मक यंत्रणा तोकडी पडत असताना विद्यमान लोकप्रतिनिधींनी यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते.

परंतु केवळ मिटींग आणि बैठका घेण्याचा फार्स केला. प्रत्यक्षात करोना चाचण्या करण्यात येणार्या अडचणी, त्याचे विलंबाने येणारे अहवाल, विलगीकरणासाठी नसलेली व्यवस्था, करोनाबाधितांना अॅडमीट करून घेतांना यंत्रणेची होणारी धावपळ, त्यातून हतबल झालेले आरोग्यसेवेतील कर्मचारी यामुळे रुग्णांची अक्षरश: हेळसांड चालविलेली आहे. आर्थीकदृष्ट्या शक्य नसलेले खाजगी दवाखान्यातील उपचार घेऊ शकत नसल्याची परिस्थिती त्या रुग्णांना आणखी सतावते.

त्यामुळे तालुक्यातील मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी मध्यंतरीच्या काळात उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले असते तर ही परिस्थिती तालुक्यावर निश्चितच ओढावली नसती. हे सर्व हाताळण्यास लोकप्रतिनिधी कमी पडले, त्यांच्या निष्क्रियतेमुळेच या प्रसंगाला जनता सामोरी जात आहे. परंतु ही परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याने आपल्या नेत्याची निष्क्रियता झाकण्यासाठीच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही सौ. साळुंके यांनी केली आहे.