आ. काळेंना श्रेय मिळू नये म्हणून कोल्हे गटाकडून विकास कामांना खोडा - नगरसेवक संदीप वर्पे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत

बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी खोडा घालण्याचे काम केले आहे. प्रत्येक कामात त्यांना भ्रष्टाचाराचा वास वाटतो. शहर विकास झाला तर याचे सर्व श्रेय आ.आशुतोष काळे यांना जाईल या भीतीपोटी शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला खोडा घातला आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील जनतेचा बदला घेत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व नगरसेवक संदीप वर्पे यांनी केली.

गौतम बँकेत आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, नगरसेवक मंदार पहाडे,विरेन बोरावके,नगरसेविका माधुवी राजेंद्र वाघचौरे , शिवसेनेच्या नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे, अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद, धरम बागरेचा, राजेंद्र वाकचौरे, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर दडियाल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी वर्पे म्हणाले की, अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. या रस्त्यांना निधी 14 व्या वित्त आयोगाचा असून त्याची मुदत संपली आहे.त्यामुळे याचे फेर अंदाजपत्रक बनवणे म्हणजे जवळपास आठ कोटींचा निधी गमावणे होय.त्यामुळे हा ठराव नामंजूर करू नये अशी रास्त मागणी केली आहे.

सुनील गंगुले म्हणाले, सर्व विषय समित्यांचे सभापती भाजपाचे आहेत. रस्त्यांच्या कामाबाबत जर तुम्हाला शंका वाटत होती तर त्यावेळेस का आक्षेप घेतला नाही तेव्हा झोपले होते का? राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा शहरातील जनतेला वेठीस धरू नका. मंदार पहाडे म्हणाले की, भाजपाचे नगरसेवक हे फक्त भ्रष्टाचाराच्या मुद्या खाली झोपल्याचे सोंग घेत आहे. फक्त विकासाची कामे नामंजूर करायची एवढेच त्यांचे ध्येय आहे.

गटनेते विरेन बोरावके म्हणाले की, जनरल मिटिंग मध्ये पहिल्याच विषयापासून भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचे काम सुरू केले. साठवण तलावाच्या विषय आपल्या अंगलट येईल हे बघून त्यांनी त्या विषयाला मंजुरी दिली. येसगाव तलावातील सौर ऊर्जा प्रकल्पाचा विषय केवळ श्रेयवादासाठी नामंजूर केला आहे. मेहमूद सय्यद म्हणाले, ह्या शहर विकासाच्या कामात सर्व नगर सेवकांचे काम होणार आहे.शहरात वाढलेल्या धुळीमुळे जनता वैतागलेली असून भाजपाचे नगराध्यक्ष ,नगरसेवक व माजी आमदार यांचा पराभव झाल्यामुळे ते जनतेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे वागत आहेत.

कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर शहर विकासाचे विषय नामंजूर केले आहेत. शिवसेनेचे दोन नगरसेवक महाविकास आघाडी सोबत विकासाच्या मुद्द्यावर आहेत. शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपा बरोबर पाकिटासाठी आहेत. त्यांना पक्षाचे देणेघेणे नाही. त्यांनी पक्षासोबत कोण आहे कोण नाही हे आम्हाला शिकवू नये.
- सपना मोरे, नगरसेविका शिवसेना.

नगर पालिका सर्वसाधारण सभेत जो प्रकार घडला तो निंदनीय असून पालिकेत गलिच्छ राजकारण होत आहे. शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी बरोबर असून शिवसेना ही महाविकास आघाडीचा एक अविभाज्य भाग असून आम्ही एकत्र आहे हीच अधिकृत भूमिका आहे.
- कलविंदर दडीयाल शिवसेना शहर प्रमुख

भ्रष्टाचाराला विरोध, शहर विकासाला नाही - उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

आमचा शहर विकासाला कोणताही विरोध नसून विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. म्हणून सर्वसाधारण सभेत विषय नामंजूर केले असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नावाने खडे फोडणार्यांनी निधी वापरून एकही फलकावर कोल्हे यांचे नाव लावले नाही.

आम्हाला राजकारण करायचे नाही. गुलाब फुले वाटून नौटंकी कारायचे कामे सुरू असून सोलर पॅनल वर लाईट लावण्यापेक्षा विकासाचे दिवे लावा अशी टीका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर केली आहे.

यावेळी भाजपा नेते पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, नगरसेवक शिवाजी खांडेकर, बबलू वाणी, नगरसेविका दीपा वैभव गिरमे, बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना निखाडे म्हणाले, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा व शिवसेना नगरसेवक यांनी काळ्या फिती लावून निषेध करत उपस्थिती लावली होती. साडे चार वर्ष ज्या नगराध्यक्षांनी नियम न पाळत अनेकांचा अपमान केले असून ते आम्हाला आमचे अधिकार शिकवत आहेत. साडे चार वर्षे आम्हाला पत्रक व माहिती दिली जात नाही. नगराध्यक्ष वहाडणे यांचा संपूर्ण कार्यकाळ व ते स्वतः निष्क्रिय असून शहराला दोन रोटेशन पुरेल इतकेच पाणी तळ्यात शिल्लक आहे. तर पालिकेतील सभेत जो विषय नामंजूर केला आहे.

त्याची पत्रके वाटून देखील निषेध केला आहे.आमचा शहरातील रस्त्याला विरोध नाही मात्र त्याचे अंदाजपत्रक जास्तीचे आहे ,जे रस्ते कामाचे नाहीत ते घेतले आहेत.ह्यात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ते नामंजूर केले असल्याचे निखाडे यावेळी म्हणाले. पराग संधान म्हणाले की,15 सप्टेंबर रोजी झालेल्या मिटिंगचे पाच महिन्यांत कच्चे प्रोसेडींग दिले गेले नाही.दोन महिन्यांनी नगराध्यक्ष ज्या इमारतीत बसणार आहेत तो निधी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आणलेला आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना ज्यांनी निधी आणला त्यांना श्रेय द्यायला आवडत नाही. शहरातील विकासात भर घालण्यासाठी शहरातील बाजार ओटे, पालिकेची सार्वजनिक ग्रंथालय, कोपरगाव पोलिस ठाणे, पालिका इमारत, गोकुळ नगरी पूल असे एक ना अनेक कामे माजी आमदार यांनी केली असून पालकमंत्री यांच्या एका मिटिंगमध्ये यांना लगेच निधी मिळाला का? असा सवाल केला आहे.

निवडणूकीनंतर ज्यांनी आ. स्नेहलता कोल्हे यांच्याकडून पैसे घेऊन महिनाभर देवदेव केले, त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. दुसर्याच्या दुकानात कामाला होते त्यांचेच दुकान बळकावून मालक झालेल्यांनी आम्हाला विकासाच्या गोष्टी करून शिवसेनेबद्दल काहीही शिकवू नये. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भावाच्या नावाने रस्त्याची कामे आहेत. त्या रस्त्यावर फक्त जनावरेच फिरतात. केवळ पैसे खायचे म्हणून कामे मंजूर करण्याचा घाट घातला जात आहे.
- कैलास जाधव उपजिल्हाप्रमुख