कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे. पोलिस याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप नागरिकांनी केला आहे.

शहरातील मटक्याच्या पेढ्या जोरात सुरू आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी मटक्याच्या चिठ्ठ्या सोशल मिडीयावर टाकून कारवाईची मागणी केली आहे. मात्र पोलिसांकडून जुजबी कारवाई करून मोठ्या माशांना अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सोशल मिडीयातून होत आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कोपरगाव शहरात सोशल मिडीयावर दिवसभर मटक्याच्या चिठ्ठ्या फिरत होत्या. करोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार गेला आहे. जे काही दोन पैसे मिळतात ते दारू आणि मटक्यातच जात आहे. गोर गरीब नागरीक दोन पैसे मिळतील या आशेने मटका खेळतात आणि हारतात. त्यामुळे ते नैरास्याच्या गर्तेत जातात.

त्यातून अनेक संसार उध्वस्त होत आहे. अनेकवेळा हेच लोक गुन्हगारीकडे वळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासन मटका बुकींच्या सेवेत तैनात असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेची ही दुरावस्था दिसत नाही, असा आरोप थेट सोशल मिडीयातून होत असून शहरातील या मटका बुकींवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.