कोपरगावी एकाच रात्री 3 कारची चोरी

File Photo
File Photo

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरात चारचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात काल रात्री पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी सह्याद्री कॉलनी, साईनगर आणि निवारा परिसरातून विविध तीन कार चोरून नेल्याने शहरात वाहन चालकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात दुचाकी चोरांचा सुकाळ झाला असून अनेकांच्या दुचाकी, चारचाकी वाहने चोरीस गेल्याचे अनेक गुन्हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत.

यात पहिला गुन्हा डॉ. जगदीश लक्ष्मीनारायण झंवर (वय 60) रा. बालाजी संकुल सुभद्रानगर यांनी दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आपण आपल्या वरील ठिकाणी आपली पांढर्‍या रंगाची मारुती एर्टीगा (क्र. एम.एच.17 बी.व्ही. 8440) इंजिन क्रं. डि. 13 ए. - 5682639) ही 7 लाख रुपये किमतीची गाडी घरासमोर कुलूप लावून उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी ती सेंटर लॉक तोडून चोरून नेली आहे. याप्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.82/2023 भा.दं.वि. कलम 379 अन्वये दाखल केला आहे.

दुसरा गुन्हा हा लेखा परीक्षक असलेले दत्तात्रय बाळाजी खेमनर (वय 57) रा. सह्याद्री कॉलनी यांची मारुती स्विफ्ट डिझायर 1 लाख 40 हजार रुपये किमतीची पांढर्‍या रंगाची कार (क्र. एम.एच. 17 ए. जे. 7725) हि गाडी घरासमोर कुलूप लावून उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यानी सेंटर लॉक तोडून लंपास केली आहे. याप्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 83/2023 भा.द.वि. कलम 379 अन्वये दाखल केला आहे.

तर तिसरी फिर्याद कोपरगाव न्यायालयात वकिली करत असलेले कनिष्ठ वकील मनोज कडू (वय-36) रा. साईनगर यांनी दिली असून त्यांची मारुती एर्टीगा (क्र. एम.एच.17 बी. व्ही. 0436) हि 5 लाख रुपये किमतीची पांढर्‍या रंगाची कार त्यांनी आपल्या घरासमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी ती सेंटर लॉक तोडून रातोरात चोरून नेली आहे.

या वाहन चोरीत चोरट्यांनी सुमारे 13 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोपरगाव शहरत पोलिसांची गस्त सुरू असताना चोर्‍या कशा होतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com