
कोपरगाव (प्रतिनिधी) / Kopargaon - कोपरगाव शहराच्या लोकसंख्येनुसार कोपरगाव शहराला पाणी आरक्षित आहे. मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे आरक्षित असलेले सर्व पाणी कोपरगाव नगरपरिषदेकडून उचलले जात नाही. पर्यायाने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असल्यामुळे आमदार आशुतोष काळे मागील पाच वर्षापासून पाच नंबर साठवण तलावासाठी आग्रही होते.
मात्र मागील पाच वर्षात माजी आमदार कोल्हे यांनी सातत्याने पाच नंबर साठवण तलावाला विरोध केल्यामुळे आज कोपरगाव शहरातील नागरिकांवर भर पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहराला भेडसावत असणार्या कुत्रिम पाणी टंचाईला कोल्हे हेच जबाबदार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.
भविष्यात कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना असणार्या आमदार आशुतोष काळे यांनी सत्ता नसताना देखील पाच नंबर साठवण तलावाच्या कामासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी देखील कोल्हेंनी पाच नंबर साठवण तलावाला पडद्यामागून विरोध करण्यात धन्यता मानली.
आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावले. हेच काम माजी आमदार कोल्हे यांनी निवडून आल्यावर केले असते तर आज ही परिस्थिती शहरातील नागरिकांवर आली नसती. भर पावसाळ्यात पाणी साठा मंजूर असताना फक्त आणि फक्त साठवण क्षमता नसल्यामुळेच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे याला सर्वस्वी कोल्हेंच जबाबदार असून त्यांचे सत्ताधारी नगरसेवकांनी केलेले आंदोलन नौटंकी असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे.