कोंढवडचा बेपत्ता युवक मृत अवस्थेत आढळला

कोंढवडचा बेपत्ता युवक मृत अवस्थेत आढळला

कोंढवड |वार्ताहर| Kodhwad

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) कोंढवड (Kondhwad) येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला युवक शुभम बापूसाहेब म्हसे याचा मृतदेह (Corpses) चंडकापूर शिवारात मुळानदीत आढळून आला.

कोंढवड येथील शुभम म्हसे हा महाविद्यालयीन युवक शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर त्याच्या घरातील मंडळी व गावातील तरूणांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र तो सापडत नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी शुभमच्या मोबाईलचे लोकेशन शोधले. कोंढवड येथे मुळा नदी काठावरील लक्ष्मीआई मंदिराजवळ शुभमच्या मोबाईलचे लोकेशन आढळले. तेथे शुभमचा मोबाईल व चपला आढळून आल्या. राहुरी पोलीस ठाण्यात शुभम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दोन दिवसांपासून मुळा नदी पात्रातील पाण्यात शुभमचा शोध सुरू होता. रविवारी दुपारी अडीच वाजता शुभमचा मृतदेह चंडकापूर थडीला नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला. शुभम विज्ञान शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, आजोबा, एक भाऊ, चुलते असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.