कोळपेवाडी आठवडे बाजारातील मासळीची खवय्यांना गोडी

कोळपेवाडी आठवडे बाजारातील मासळीची खवय्यांना गोडी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोळपेवाडीत भरणार्‍या आठवडे बाजारात मिळणार्‍या ताज्या मासोळीची खवय्यांना चांगलीच गोडी लागली असून मासे हातोहात विकले जात आहे. नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील मासे विक्रेता व्यापार्‍यांची कोळपेवाडी आठवडे बाजाराला पंसती असते.

हप्त्याला काम करून मजुरांच्या हातात मिळालेला पगार कुंटुबासह कोळपेवाडी आठवडे बाजारची वाट चालू लागतो. कष्टकरी वर्गाची पहिली पंसती मासळीच्या गल्लीत गोदावरी नदीच्या गोड्या पाण्यात मिळणार्‍या झिंगा, मर्हळ, काळी वांब, मुर्ह्या आंबळ्या, सिल्व्हर खेकडा यांना किलोला चारशे ते सहाशे रुपये मोजततात. रात्री आठ वाजेपर्यंत शेकडो किलो मासे हातोहात विकले जातात.

पंचक्रोशीतील दहा खेडेगावाची बाजारपेठ म्हणून कोळपेवाडीचा नामोल्लेख असल्याने नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापारी वर्ग आठवडे बाजारास हजेरी लावतो. ग्रामवासियांनी स्व. शंकरराव काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो एकर जमीन कोसाका उद्योग समुहास दिली. या माळरानावर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होऊन हा परिसर रोजगार निर्मिती उद्योग व्यवसाया बरोबर व शेतीला बारमाही मिळणार्‍या हक्काच्या पाट पाण्याने बहरल्याने कोळपेवाडी गाव नावारूपास आल्याने लोकवस्ती वाढीस लागली.

ग्रामपंचायतने व्यापार्‍यांचे व्यवसायानुसार वर्गीकरण करत स्वतंत्र गल्ल्या विकसित केल्याने ग्राहकांना माफक दरात वस्तू खरेदी करणे सोपे जाते. भाजीपाला, कडधान्य, रेडिमेड कपडे, पान तंबाखू, मसाले, फळे, भेळभत्ता, वडे भजे, भांडी, मिरची, चपला, फुटाणे, गूळ, किराणा, तेल, कटलरी, सुकी मासळी, टोपल्या, केरसुणी बरोबर जुने कपडे विक्रेता देखील आठवडे बाजाराला आवर्जून हजेरी लावतो. असा हा बाजार चार एकराच्या पुढील विस्तीर्ण मैदानात अंधार गडद होईपर्यंत चालत असलेला तालुक्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार म्हणून प्रसिद्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com