
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
मागील काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांना दुसर्यांदा करोनाने गाठल्यामुळे त्यांनी घरी राहूनच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन करोनावर मात केली. करोनातून मुक्त होताच कोळपेवाडी, सुरेगावच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी आणून ना. आशुतोष काळे पुन्हा एकदा जनसेवेत रुजू झाले आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या होत्या. यापैकी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या सुरेगाव व कोळपेवाडी या गावातील पाणी पुरवठा योजनांचा देखील समावेश होता. ना. आशुतोष काळे यांचा सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन एक महिन्यापूर्वी या दोन्ही पाणीपुरवठा योजनांना महाविकास आघाडी सरकारने तांत्रिक मंजुरी दिली होती. या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळून या योजनांचे काम तातडीने सुरू कसे होईल यासाठी ना. आशुतोष काळे यांचा आटापिटा सुरू होता.
मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने व साईबाबांच्या कृपेने ज्यावेळी त्यांचा करोना तपासणी अहवाल नकारात्मक आला. त्याच्या दुसर्याच दिवशी त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेला वाहून घेत दाखल केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यासाठी मंत्रालय गाठत कोळपेवाडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 18 कोटी 46 लाख 82 हजार व सुरेगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 15 कोटी 69 लाख 26 हजार अशाप्रकारे या दोन योजनांसाठी तब्बल 34.16 कोटी ची प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. त्यामुळे या दोन्ही पाणीपुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.