पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे कोळपेवाडी, सुरेगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे कोळपेवाडी, सुरेगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडीत कल्याण- मुंबई मटका, गुटखा, गांजा, पत्त्यांचा क्लब, सोरट अवैध देशी दारु, केमिकल युक्त ताडी, खाजगी सावकारी, आदी धंद्याना तालुका पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे सुगीचे दिवस आले आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत असून आर्थिक कमाई व्यसन व जुगारात उडवत आहे. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी वाढुन दुकान फोडणे, मोटारसायकल व शेतकर्‍याच्या विद्युत मोटारीची चोरी करणार्‍या नवीन टोळ्या उदयास येत आहे. पोलिसांच्या हिट लिस्टमध्ये असणारे गुन्हेगाराचा वावर या परिसरात होत असल्याने सामान्य नागरिक व व्यवसायिक हताश झाले आहे. या परिसरातील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद होण्यासाठी श्रीसाई सेेवा प्रतिष्ठान संस्थेने नाशिक पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे, सुरेगाव कोळपेवाडीमध्ये पोलीसांच्या अर्थपूर्ण संबंधा मुळे कोळपेवाडी ग्रामपंचायत शेजारील गाळ्यांमध्ये कल्याण मुंबई मटका, सोरट, देशी दारू या अवैध धंद्यामुळे मद्यपी जुगारीचा या ठिकाणी वावर असतो. येथे मारामारी शिवीगाळ नित्याचेच झाले आहे. येथे 100 मिटर च्या अंतरावर जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आहे. जवळच कोळपेवाडी पोलीस दूरक्षेत्र आहे. आठवडाभर मजुरी केलेली कमाई रविवारी आठवडे बाजारच्या दिवशी सोरट मटक्यावर लावून हताश झालेला तरुण देशी पिऊन रस्त्याच्याकडेला खिसा रिकामा करून पडलेला असतो. नागरिकांच्या आरोग्यास घातक गुटखा या परिसरात ट्रकने गोडावूनमध्ये उतरवून किराणा दुकान, पान टपरी यांना पोहच केला जातो.

सुरेगावात गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला मटका बुकी, पत्याचा क्लब, अवैध देशी दारू, भेसळयुक्त ताडी आदींची दुकाने खुलेआम सुरू आहेत. फुगा पॅकिंग करून ताडी विक्री व्यवसाय दुकान थाटून ग्राहकांना थंड जारचे पाणी पाजत चोविस तास सेवा देत आहे. तरुण वर्गात गांजा पिण्याची क्रेझ वाढविण्यासाठी पंटरद्वारे मोफत गांजा पुरवठा केला जातो. तल्लीन झालेले व्यसनाधीन तरुण काम धंदा सोडून कॅनालच्या कडेला चकरा मारत असतात. विनापरवाना खाजगी सावकारीनेही या परीसरात पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. या व्यवसायात महिला आघाडीवर आहे. 10 ते 15 टक्के महिना व्याजाने वसुली केली जाते. वेळेवर व्याज मुद्दल न दिल्यास प्लॉट घर वाहनावर ताबा घेतला जातो.

अवैध सावकारी करणारे भीशी चालवून लिलाव बोली वाढवत सर्वसामान्य नागरिकांची लूट करतात. या भागात दुकान व घर फोडी मोटारसायकल शेतकर्‍याच्या विद्युत मोटारी भंगार चोरीच्या घटनांनी व्दिशतक पार केले आहे. अद्याप एकाही दुकान फोडीचा तपास लागलेला नाही. पोलिसांच्या रेकॉर्डवर असणार्‍या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या बाहेरील पोलिसांनी येथे येवून आवळलेल्या आहेत मात्र स्थानिक पोलिसांना याचा थांग पत्ता नसतो. लक्ष्मी ज्वेलर्सच्या दरोड्यांत व्यवसायीक शाम घाडगे यांचा गोळीबारात झालेला मृत्यू हा पोलीस औट पोस्ट बंदअसल्या मुळेच झाला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

पोलिस व उत्पादन शुल्क विभाग यांना अवैध धंद्याची खडान्खडा माहिती असताना अर्थपूर्ण संबधांमुळे केलेले दुर्लक्ष गुन्हेगारी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी चार्ज घेताच अगोदर बंद असणारे पत्याचे क्लब, सोरट हा व्यवसाय जोरात चालू झाला आहे. शासनास अवैध व्यवसायावर बंदी घालण्यात यश येत नसल्यास अवैध व्यवसायिकांना परवाने वाटप करावे म्हणजे यातून महसूल तरी प्राप्त होईल असा उद्विग्न सवाल श्री साई सेवा प्रतीष्ठानने नाशिक पोलीस महानिरीक्षक यांना केला असून अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com