कोल्हारमध्ये एकाच जागी बिबट्या जेरबंद होण्याची हॅट्रिक

कोल्हारमध्ये एकाच जागी बिबट्या जेरबंद होण्याची हॅट्रिक

कोल्हार | वार्ताहर

कोल्हार बुद्रूक येथे पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाजवळ स्व. वसंतराव खर्डे यांच्या वस्तीवर शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ६ वर्षे वयाचा मादी बिबट्या जेरबंद झाला. या एकाच जागेवर दोन महिन्याच्या कालावधीत तिसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नवल मानले जात आहे. एकाच ठिकाणी तीन बिबटे जेरबंद होणे अर्थात क्रिकेटच्या भाषेत हॅटट्रीक घडण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी.

या भागात आतापर्यंत दोन बिबटे अडकूनही आणखी बिबट्याचा संचार होता. त्यामुळे येथील साठवण तलावाशेजारी २० दिवसापासून पिंजरा लावण्यात आला. त्यात सावज ठेवूनही बिबट्या पिंजराभोवती वळसा मारुन जायचा. शुक्रवारी मात्र शेळीच्या सावजामुळे बिबट्या पिंजऱ्यात अलगदपणे अडकला. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या, वासरे, पाळीव कुत्रे यांचा फडशा पाडला.

बिबट्याचे कायम दर्शन होत असल्याने येथील रहिवाशी शेतकरी बिबट्याच्या भितीखाली वावरत होते. मागील दोन महिन्यात याचठिकाणी एक नर बिबट्या व एक मादी बिबट्या जेरबंद झाले होते. शुक्रवारी रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी नगरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सौ. सुवर्णा माने, कोपरगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. गाढे, श्री. साखरे यांना दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला लोणीच्या शासकीय रोपवाटिकेत विश्रांतीसाठी नेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com