कोल्हारमध्ये हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न

दोन गटांत वादावादी, परस्परांविरुद्ध फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या 10 जणांविरुध्द गुन्हे दाखल
कोल्हारमध्ये हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक येथील अंबिकानगर वसाहतीमध्ये एका छोट्या मुलीला एका युवकाकडून धक्का लागल्याचे निमित्त घडले. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या वादात एका गटाने हातात नंग्या तलवारी तसेच लाकडी दांड्यांचा वापर करीत दहशत निर्माण केली. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल झाले. भर लोकवस्तीत दिवसाढवळ्या हत्यारांचा झालेला वापर यामुळे कोल्हार भगवतीपूर परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.यासंदर्भात परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्नेहल विनायक वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 22 रोजी अमोल शंकर बर्डे याचा एका छोट्या मुलीला धक्का लागल्यावरून वाद झाला होता. तो समझोत्याने मिटला. मात्र याच वादाचा राग मनात धरून काल गुरुवार दि. 23 रोजी सकाळी येथील जब्बार एजाज खान, अफरोज असलम शेख, सलमान चांद खान, आबिद जमशेद सय्यद, शाहरुख चाँद शेख यांनी हातात तलवारी व लाकडी दांडे घेऊन घरासमोर येऊन शिवीगाळ करत तुमचे जे पोर आमच्याकडे आले होते ते कोठे आहे ? ते तुमच्या घरात लपले आहे असे म्हणून त्यांच्यापैकी एकाने घरात घुसून पाहणी करू लागला. त्यांच्यापैकी एकाने मला लोटून दिले. तसेच त्यांच्या हातातील तलवारी व लाकडी दांड्याने बाजूस लावलेल्या पत्र्यावर मारले. तुम्ही आता माजले आहेत. तुमचा एक एकाचा बेत पहावा लागेल अशी दमबाजी करत निघून गेले.

या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात वरील पाच आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 354, 452, 143, 147, 149 आणि आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा नोंदिविण्यात आला आहे.

तर सुलताना अस्लम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 22 रोजी माझी 12 वर्षीय नात घरासमोर खेळत असताना अमोल शंकर बर्डे याने दारूच्या नशेत तिला धक्का दिल्याने ती रोडवर पडली. मी लगेच नातीला खांद्यावर घेतले तुला लहान मुले दिसत नाही का ? नीट चालता येत नाही का ? असे म्हणून निघून गेले. त्यानंतर रात्री 11 वाजता अमोल बर्डेचा भाऊ कार्तिक शंकर बर्डे हा दारू पिऊन घरासमोर हातात कुर्‍हाड घेऊन आला व कोणी माझ्या भावाला शिवीगाळ केली ? असे म्हणत त्याचे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली. गल्लीतील लोकांनी त्याला समजावून सांगितल्यानंतर तो घरी निघून गेला. म्हणून आम्ही काही तक्रार केली नाही. त्यानंतर काल दि. 23 रोजी सकाळी अमोल शंकर बर्डे, कार्तिक शंकर बर्डे, विशाल भाऊसाहेब बर्डे, मुकुंद शिवाजी गांगुर्डे व इतर एक जण असे हातात लाठ्या - काठ्या, कुर्‍हाडी घेऊन घरासमोर आले. तुम्ही फार माजले आहेत. तुम्हाला घरात घुसून मारले पाहिजे. असे म्हणून माझ्या घरावर दगडफेक करू लागले. म्हणून माझे नातेवाईक सदर ठिकाणी येऊ लागल्याने ते तेथून आमच्या दिशेने दगडफेक करीत पळून गेले.

या फिर्यादीवरून वरील पाच आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम 143, 147, 149, 510, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण झाले असून सदर व्हिडिओ व्हायरल झाले. हत्यारांचा उघडउघड वापर झाल्याचे पाहून संपूर्ण गावात चीड व चिंता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची खबर मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी हे पोलीस ताफा घेऊन फौजफाट्यासह दाखल झाले.

घटने पश्चात दोन्ही बाजूकडील गट कोल्हार पोलीस दूरक्षेत्रामध्ये जमा झाले.पोलिसांनी निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांना तात्काळ लोणी पोलीस ठाण्यात येण्याचे फर्मान काढले. सकाळी घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल होण्यासाठी रात्री उशीर झाला. तोपर्यंत दोन्ही गट उशिरापर्यंत लोणी पोलीस ठाण्यात थांबून होते. प्रकरण मिटविण्यासाठी काही कार्यकर्त्यांकडून कसोशीने प्रयत्न झाले परंतु ते निष्फळ ठरले.

तलवारींचा नंगानाच...

घडलेल्या या घटनेचे दोन व्हिडिओ गावामध्ये व्हायरल झाले. व्हिडीओ चित्रीकरणात हातामध्ये नंग्या तलवारी व लाकडी दांडे घेऊन एक मोठा समूह चाल करून जाताना दिसत आहे. एकंदरित या घटनेच्या अनुषंगाने कोल्हार भगवतीपूर येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे दिसत आहे. नेमक्या एवढ्या तलवारी आल्या कोठून व त्यांचा साठा का केला गेला ? यास पायबंद कोण घालणार आणि कधी ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांमधून याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.अशा दहशत निर्माण करणार्‍या घटनांना आळा कधी बसणार ? असा संतप्त सवाल केला जात आहे.

Related Stories

No stories found.