कोल्हार |वार्ताहर| kolhar

सिंहासनाधिष्ठीत शिवप्रतिमेसमोर पेटलेल्या शेकडो दिव्यांचा लखलखाट... त्यासंगे धगधगत्या जळत्या मशालींच्या ज्वाला... सोबतीला गगनभेदी फटाक्यांची आतषबाजी... यामध्ये कोल्हार भगवतीपूरचा आसमंत उजळला. निमित्त होते शिवजयंतीच्या दीपोत्सवाचे.

कोल्हार भगवतीपूर येथील शिवजयंती महोत्सव संपूर्ण प्रवरा परिसराच्यादृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. प्रतिवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने येथे संपूर्ण सप्ताहभर निरनिराळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते. गावभर प्रमुख रस्त्यांवर डौलाने फडकणारे शेकडो भगवे ध्वज संपूर्ण वातावरण शिवमय करून टाकतात. यंदाचे वर्षही याला अपवाद नाही. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले भगवे ध्वज शिवजयंती नजीक आल्याची साक्ष देत आहेत.

यंदाच्या वर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने साप्ताहभरात विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 फेब्रुवारी रोजी बस स्थानक प्रांगणात भव्य जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा भरविण्यात आल्या. यामध्ये यंदाचा छत्रपती चषक व प्रथम क्रमांकाचे 11 हजार 111 रुपयांचे प्रथम पारितोषिक कोपरगावच्या संघाने पटकाविले. 7 हजार 777 रुपयांचे द्वितीय बक्षीस नेवासा येथील संघाने तर 5 हजार 555 रुपयांचे तृतीय बक्षीस कोल्हार भगवतीपूरच्या संघाने प्राप्त केले.

सोमवार दि. 15 फेब्रुवारी रोजी कोल्हार बस स्थानकाच्या पटांगणात यंदाचा दिपोत्सव, मशाल उत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काल मंगळवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चित्तथरारक मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. संगमनेरच्या हिंदू राजा मर्दानी खेळ पथकाने वेगवेगळे साहसी खेळ सादर करीत शिवप्रेमींची मने जिंकली.

बुधवार दि. 17 फेब्रुवारी रोजी कोल्हार भगवतीपूर गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात दरवर्षीप्रमाणे दिमाखात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये युवकांचा मोठा प्रतिसाद असतो. गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी भगवतीदेवी मंदिरामध्ये सायंकाळी 6 वाजता विकास महाराज गायकवाड यांचे शिवगीत व साईभजन संध्या कार्यक्रम होईल.

शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत शिवप्रतिमेचे पूजन संपन्न होईल.