
कोल्हार |वार्ताहर| Kolhar
कोल्हार बुद्रृूक येथील निबे-भणगे-गायकवाड वस्ती रोडचा 15 वर्षापासूनचा वाद प्रलंबित होता. वादापायी दिवसेंदिवस रस्ता अरुंद होत खितपत पडला. त्यामुळे स्थानिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नाबाबत सामंजस्याने तोडगा काढला. अखेर आता हा रस्ता 16 फूट रुंदावला. त्यावर मुरुमीकरण झाले. रस्त्याचे रूप पालटले. रस्त्याबरोबरच एकमेकांपासून दुरावलेली मने जुळली. याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
कोल्हार बुद्रूक येथील निबे-भणगे-गायकवाड वस्ती रस्ता हा साधारणतः एक किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यालगत अनेक वस्त्या आहेत. मात्र अनेक वर्षापासून आपापसातील वादात रस्ता सापडला. वादाचे मुख्य कारण रस्त्यालगतच्या शेतजमिनीचे बांध हे मुद्दे होते. हे वाद तहसीलदारांपर्यंत गेले.
बर्याच वर्षांपूर्वी कोल्हार बुद्रूक ग्रामपंचायतने ग्रामनिधीतून या रस्त्यांचे 8 फूट रुंदीचे खडीकरण केले होते. कालांतराने हा रस्ता अरुंद होत 5 फुट रुंदीचाच शिल्लक राहिला. रस्त्यावरील खड्डे बुजवून दिले जात नव्हते. रस्त्यावरून चार चाकी वाहन येऊ-जाऊ शकत नव्हते. दुचाकी वाहन तेवढे जात असे. रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने शेतीमाल या रस्त्याने बाहेर काढता येत नव्हता. गंभीर आजारी रुग्णाला हॉस्पिटलला तातडीने नेणे अशक्यप्राय बनले.
वाहतूक बंद झाली. दैनंदिन दळणवळण बंद पडले. अशा एक ना अनेक समस्यांना रस्त्यालगतच्या रहिवाशांना सामोरे जावे लागले. मध्यंतरीच्या काळात प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी येथे भेट दिली मात्र त्यास यश आले नाही. दोन वर्षापूर्वी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या भागास भेट दिली. मुरुमीकरण करण्याचे मंजूर केले. आजूबाजूच्या शेतकर्यांनी आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे रस्त्याची समस्या सोडविण्याकामी धाव घेतली. आ. विखे पा. यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे यांना या भागात प्रत्यक्ष पाहणी करायला सांगितले. स्थानिक शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेणेबाबत सूचना केल्या.
श्री. रहाणे यांनी प्रदीप गाडेकर, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, गोरक्षनाथ खर्डे यांना समवेत घेऊन या भागातील शेतकर्यांची बैठक घेतली. प्रश्न नीटपणे समजावून घेतले. आपापसात सामंजस्य राखून हा प्रश्न सोडवता येणे शक्य असल्याचे त्यांनी स्थानिकांना सांगितले. एवढेच नव्हे तर वरील सर्व पदाधिकार्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष उभे राहून रस्ता रुंदीकरणाबरोबरच मुरुमीकरण करून घेतले. स्थानिक शेतकर्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सामंजस्याची भूमिका घेतली. आता रस्ता तर झालाच शिवाय आपापसातील टोकाचे मतभेद दूर झाले. मने जुळली असल्याचे श्री. रहाणे यांनी सांगितले. परिणामी अत्यंत अरुंद होत गेलेला हा रस्ता आता 16 फुट रुंदीचा झाला. त्यावर आमदार निधीतून मुरुमीकरण करण्यात आले. दैनंदिन समस्यातून आता शेतकर्यांची सुटका झाली. याबद्दल समाधान व्यक्त करीत आमदार राधाकृष्ण विखे यांना धन्यवाद दिले.