कोल्हार खुर्द सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना प्रारंभ

कोल्हार खुर्द सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना प्रारंभ

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या कोल्हार खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना प्रारंभ झाला. येणार्‍या नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडण्याची संभावना आहे. प्राथमिकदृष्ट्या या निवडणुकीत दुरंगी लढत होण्याची शक्यता असली तरी तिसर्‍या गटाकडूनही निवडणुकीत दंड थोपटले जाण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द सोसायटीच्या सध्याच्या कार्यकारिणीची मुदत दीड वर्षापूर्वीच संपली. मात्र करोनाच्या प्रादूर्भावामुळे निवडणुका लांबल्या. सद्यस्थितीत करोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने तसेच लॉकडाऊन उठविण्यात आलेले असल्यामुळे मुदत संपलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार अहमदनगर सहाय्यक उपनिबंधक यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू झालेले आहे.

त्याअनुषंगाने 9 डिसेंबर 2021 रोजी कोल्हार खुर्द सोसायटीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 20 डिसेंबरपर्यंत त्यावर हरकती स्वीकारण्यात आल्या. अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. कोल्हार खुर्द सोसायटीची सभासद संख्या 1475 इतकी असली तरी मयत, थकबाकीदार, अपूर्ण शेअर्स वगळून 1051 सभासद निवडणूक मतदानास पात्र आहेत. मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सोसायटीची वार्षिक उलाढाल साधारणतः सहा कोटी रुपयांपर्यंत आहे.

संस्थेमध्ये सध्या माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाची सत्ता आहे. प्रवीण कानडे सोसायटीचे अध्यक्ष असून प्रभाकर जाधव हे उपाध्यक्ष आहेत. कोल्हार खुर्द सोसायटीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये स्थानिक राजकीय वातावरण ऐन हिवाळ्याच्या गारठ्यात तापू लागले आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हार खुर्दचे सरपंच प्रकाश पाटील तसेच दत्ता पाटील, दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाचा सत्ताधारी पॅनल या निवडणुकीत असणार आहे. याविरुद्ध राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुसरा पॅनल उभा ठाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज भाऊसाहेब लोंढे व रामनाथ शिरसाठ, प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ यांच्या तिसर्‍या गटाकडूनही पॅनल उभा करण्याबाबत चर्चा जोरात आहे. असे झाले तर कोल्हार खुर्द सोसायटीची वरवर दुरंगी दिसणारी लढत तिरंगीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com