कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीचा गुपचूप प्रचार शिगेला

वैयक्तिक गाठी-भेटींमुळे चुरशीचे वातावरण
कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीचा गुपचूप प्रचार शिगेला

कोल्हार | Kolhar

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असून चुरशीचे वातावरण निर्माण झाले. निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यावेळी जाहीर सभांना फाटा देण्यात आला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप नाहीत. कॉर्नर मिटींग नाहीत. पर्यायाने मतदारांपुढे निवडणुकीचे मुद्दे गेले नाहीत. अगदी मौन धारण करून शांतपणे हाती बॅलेट पेपर घेत मतदारांच्या वैयक्तिक गाठी-भेटी घेण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. घराघरांत पोहोचण्याचा प्रयत्न होताना प्रकर्षाने दिसला.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणूक असो अथवा सोसायटीची निवडणूक असो, घमासान हा ठरलेलाच. हा येथून मागचा अनुभव. यंदाची निवडणूक गुपचूपपणे आरोप-प्रत्यारोपांना फाटा देऊन होत असली तरी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे, हे मात्र तितकेच खरे. ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद मिळून एकूण 16 जागा आहेत. यातील एक जागा बिनविरोध झाली. सद्यस्थितीत एक सरपंचपद आणि उर्वरित 14 जागांसाठी निवडणूक होत असून सरपंच पदासाठी 5 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 34 उमेदवार नशीब आजमावत आहेत. एकूण 5 प्रभागातून उमेदवार निवडले जाणार असून 5300 मतदार उमेदवारांचा फैसला करणार आहेत.

यंदाची निवडणूक दुरंगी होत असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे दोन्ही समर्थक गटांनी एकमेकांसमोर दंड थोपटून आव्हान दिले आहे, असे असले तरी अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणूक आणि निकाल संमिश्र होण्याची संभावना नाकारता येत नाही. सरपंचपद जनतेतून निवडले जाणार असून सर्वसाधारण महिलेकरिता ही जागा राखीव आहे. या पदाकरिता 5 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत.

यामध्ये विखे पा. प्रणित ग्राम सुधारक मंडळाकडून राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. दिगंबर कारभारी पाटील यांच्या धर्मपत्नी अनिता दिगंबर पाटील तसेच विखे पा. प्रणित जनसेवा विकास आघाडीचे नेतृत्व करीत असलेले भाऊसाहेब गंगाधर लोंढे यांच्या धर्मपत्नी राहुरी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या कमलबाई भाऊसाहेब लोंढे या आमने-सामने लढत देत आहेत. याखेरीज अपक्ष उमेदवार स्नेहल श्रीधर शिरसाठ, स्नेहल धनंजय शिरसाठ व ज्योती अण्णासाहेब धाकतोडे यांनी सरपंचपदाकरिता रणशिंग फुंकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल शिरसाठ यांचे पुत्र दिग्विजय शिरसाठ हे विखे गटात दाखल होऊन निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे त्यांचा विखे गटाला असलेला पारंपरिक विरोध या निवडणुकीत राहिला नाही. उद्या शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी जाहीर प्रचाराची सांगता होणार असून रविवार दि. 18 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होईल. मंगळवार दि. 20 रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून उत्सुकता ताणली गेली आहे. कोल्हार खुर्द ग्रामस्थ यावेळी कुणाच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार आहेत हे यादिवशी समोर येईलच.

कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणूक वरकरणी गुपचूप होताना दिसते अर्थात सभांना तसेच कॉर्नर बैठकांना फाटा दिला गेला. घराघरांत पोहोचून मतदारांच्या गाठी-भेटी घेत त्यांना रिझवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मौन धारण करून शांतपणे निवडणूक होत असल्याने आवाज कुणाचा आणि मतदारांचा कल कुणाकडे? याचा थांगपत्ता लागताना दिसत नाही. आमने सामने असलेले दोन्ही गट विखे पाटलांना मागणारे असले तरी कोणता गट सत्तेवर विराजमान होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. अपक्ष उमेदवार मुसंडी मारतात की नाही हेही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com