कोल्हार खुर्दची ग्रामसभा वादळी

जलजीवन योजनेची फेरनिविदा करण्याची मागणी
File Photo
File Photo

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेत आरोप प्रत्यारोप होऊन गोंधळातच कोणत्याही निर्णयाविना ग्रामसभा गुंडाळण्यात आली.

कोल्हार खुर्द येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना या विषयावर चर्चा करून त्याबाबत अहवाल शासनास पाठविण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सरपंच अनिता शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा सिद्धीबाबा मंदिरातील सभागृहात पार पडली. यावेळी जलजीवन मिशनचा विषय निघाला असता ग्रामस्थ या विषयावर आक्रमक झालेले दिसून आले.

कोल्हार खुर्द येथे जलजीवन मिशन मंजूर झाल्यापासून गावासाठी डोकेदुखी ठरत आहे. मंजुरी पूर्वीपासूनच्या बैठका, गावातीलच ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याचा आग्रह आणि मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई आणि काम सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने ग्रामस्थांना दाखवलेला ठेंगा, कामाचा दर्जा या मुद्यांवर गेल्या वर्षभरापासून या योजनेने गावातील वातावरण ढवळून निघाले.

ग्रामसभेत केवळ जलजीवन मिशन हा एकमेव विषय असल्याने ग्रामसभा सुरू होताच ग्रामस्थांनी सदर योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत आलेल्या अडचणींचा पाढाच अधिकार्‍यांसमोर वाचून दाखवला. यामध्ये संबंधित ठेकेदार हा काम करत असताना ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नाही. जलवाहिनीचे खोदकाम करताना अनेक ठिकाणी रस्ते परवानगी नसताना खोदले. अशा अनेक बाबी सदर ग्रामसभेत चर्चेत आल्याने सदर योजनेची फेरनिविदा काढण्यात यावी अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी मांडली. त्यास काही ग्रामस्थांनी सहमती दिली. उपस्थितांपैकी जवळपास निम्यापेक्षा जास्त ग्रामस्थांनी याला सहमती दर्शवली असल्याने सदर योजनेची फेरनिविदा काढावी, अशी प्रमुख मागणी या सभेत करण्यात आली.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील जलजीवन योजना ही नागरिकांच्यादृष्टीने जिव्हाळ्याची असली तरी या योजनेमुळे गावातील राजकारण दूषित झाले. गावात वाद निर्माण होत असून गेल्या दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेली ही योजना अद्यापही सदर योजनेचे काम मार्गी लागत नसल्याने आणि सदर कामांमध्ये ठेकेदार ग्रामस्थांना सहकार्य करत नसून ग्रामपंचायत सदस्यांना देखील विश्वासात घेत नसल्याने या योजनेची फेरनिविदा काढण्यात यावी असा ठराव या विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्याची मागणी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com