कोल्हारच्या शेतकर्‍यांना 4 दिवसांपासून वीज मिळेना

शेतकरी संतापले
कोल्हारच्या शेतकर्‍यांना 4 दिवसांपासून वीज मिळेना

संजय कोळसे

कोल्हार (वार्ताहर) - कोल्हार भगवतीपूर येथे तिसगाव फिडर अंतर्गत असणार्‍या शेतकर्‍यांना गेल्या 4 दिवसांपासून वीज मिळेना. सलग 4 दिवसांपासून येथील शेतकरी अंधारात आहेत. पाण्याविना पशुधन व्याकूळ झाले आहे. घरात पिण्यासाठी आणि वापरायला पाणी मिळेना. मात्र महावितरणाचा एकही अधिकारी व कर्मचारी साधा फोन रिसीव्ह करण्याची तसदीसुद्धा घेईना. यामुळे येथील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

महावितरणचे तिसगाव फिडर म्हणजे कायमची डोकेदुखी. या फिडर अंतर्गत कोल्हार, भगवतीपूर, तिसगाव, बाभळेश्‍वर, लोहगाव, कडीत आदी गावातील तब्बल 30 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा अतिरिक्त वीजभार आहे. त्यामुळे या फिडर अंतर्गत जेवढे वीज ग्राहक आहेत त्यांना सातत्याने खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. या फिडर अंतर्गत बहुतांशी शेतकरी वर्ग वीज ग्राहक आहेत. येथील विजेचा लपंडाव ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची समस्या. मात्र ती कायमची निकाली काढण्याची आजपर्यंत कुणालाही सवड झाली नाही. राजकीय नेते असो अथवा महावितरणचे अधिकारी-पदाधिकारी यांना कुणालाही हा प्रलंबित प्रश्‍न सोडविता आला नाही. उर्जामंत्री हे शेजारच्या तालुक्यात असतांनाही ही दैना आणि विजेची परवड नशिबी आहे हे विशेष.

या भागात शनिवारी सकाळी 7 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत झाला नाही हे दुर्दैव. 4 दिवस अंधारात आणि पाण्याविना शेतकर्‍यांना कंठावे लागतात हे आजच्या प्रगत युगात विचार करायला लावणारे नक्कीच आहे. 4 दिवसापासून शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाणी मिळेना की अंगणाच्या गोठ्यात बांधलेल्या पशुधनाला पाणी मिळेना. तहानलेली जनावरे व्याकूळ होऊन हंबरडा फोडतात परंतु विजेअभावी शेतकरी हतबल झाला. उभ्या पिकांना पाणी देणे तर दूरच, रात्रीच्या काळोखात बिबट्याची भीती अवतीभवती मानगुटीवर बसलेलीच.

वीज पुरवठा कधी सुरळीत होणार हे विचारायची सोय राहिली नाही. वीज वितरण कार्यालयात फोन केला असता, कोणी उचलत नाही. मोबईल रिसीव्ह करायला अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वेळ नाही. जरी बोलणे झालेच तर उडवाउडवीची उत्तरे ठरलेली. बाभळेश्‍वर केंद्रावर बिघाड झाला आहे, दुरुस्तीचे काम सुरु आहे असे सांगून बोळवण केली जात आहे. 4 दिवस बिघाड दुरुस्ती सुरु आहे हेही विशेष. काही महाशयांनी मोबईल व फोन बंद करून मौन साधले.

वर्षाचे बाराही महिने कायमच तिसगाव फिडरवरील अतिरिक्त वीज भारामुळे उद्भवणार्‍या या समस्येमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारीदेखील हतबल झाले आहेत. कर्मचारी अहोरात्र बिघाड दुरुस्तीची कामे करीत आहेत. तथापी स्वतंत्र मोठे ट्रान्सफॉर्मर्स आणि अनुषंगिक साहित्याअभावी वीज सुरळीत सुरू ठेवण्यात त्यांनाही सातत्याने अपयश येत आहे.

या कारणास्तव तिसगाव फिडरचा हा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता कोल्हार बुद्रुक येथे स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारणीसाठी मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी जमिनीचे भूसंपादन सुद्धा केलेले आहे. तसेच खर्चाची तरतूद ही करण्यात आली आहे. परंतु पातळीवरील अनास्था आणि लालफितीचा कारभार यामुळे जैसे थे परिस्थिती आहे. हा प्रश्‍न तातडीने सुटला नाही तर शेतकरी लवकरच नुकसान भरपाईसाठी वीज नियामक आयोगाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com