कोल्हारमध्ये गाढवं, डुकरांकडून पिकांची नासधूस

तात्काळ दखल घेऊन कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन-खर्डे
कोल्हारमध्ये गाढवं, डुकरांकडून पिकांची नासधूस

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुकमध्ये मोकाट सोडलेल्या पाळीव गाढवं आणि डुकरांचा उपद्रव वाढला असून त्यांच्याकडून शेती पिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून हा त्रास भोगावा लागत आहे. यास शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन यावर कारवाई करावी अन्यथा सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचा संतप्त इशारा येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य शरद चंद्रकांत खर्डे यांनी दिला.

आधीच शेतीमालाला भाव नाही. अशात लहरी निसर्गाच्या चक्रातून कशीबशी पिके वाचवायची कसरत करायची. या विवंचनेत शेतकरी असताना आता या गाढवं आणि डुकरांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः कोल्हार बुद्रुक येथील राजुरी रस्ता, जुना नांदूर रस्ता, तिसगाव रस्ता, नगर-मनमाड महामार्गालगतच्या शेतांमध्ये या जनावरांचा धुडगूस आहे.

मोकाट सोडून दिलेले ही गाढवं आणि डुकरं दिवसा तसेच रात्री शेतांमध्ये घुसतात आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. एवढेच नव्हे तर जनावरांच्या गोठ्यात घुसून चारापाणी खाऊन टाकतात. त्यांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला असता, ते अंगावर धावून येतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही शेतकर्‍यांनी शेताभोवती तार तसेच जाळीचे कुंपण केले. त्या कुंपणाखालून ही जनावरे शेतात घुसतात. प्रत्येक शेतकरी कंपाउंड करण्यासाठी खर्च करू शकत नाही.

ही जनावरे गावातील काही लोकांनी पाळलेली असून त्यांच्या मालकांकडे शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या असता, ते हा विषय एकमेकांवर ढकलून हात झटकतात. नदीचे पाणी कमी झाल्यावर याच गाढवांवरून रात्रीच्यावेळी वाळू वाहतूक केली जाते. आणि दिवसाही गाढवे शेतामध्ये मोकळी सोडून दिली जातात. ज्यांना जनावरे पाळायची आहेत त्यांनी स्वतः त्यांची सोय करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना त्याचा त्रास का ? शेती पिकांच्या या होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांकडून केला जात आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालण्याची नितांत आवश्यकता आहे. स्थानिक गावपुढार्‍यांना याबाबत सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाने याची दखल घेऊन यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा कोल्हार बुद्रुक येथील शेतकर्‍यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य शरद खर्डे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com