कोल्हारमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 3 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हारमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 3 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक येथील झुंबरलाल कुंकूलोळ कॉम्प्लेक्समध्ये काल गुरुवार दि. 10 नोव्हेंबर रोजी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला.

आदिती अभिजीत वडितके या श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील असून हल्ली कोल्हार बुद्रुक येथील झुंबरलाल कुंकूलोळ कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्या गळनिंबला गेल्याने त्यांचा फ्लॅट बंद होता. काल गुरुवारी सकाळपासून त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्याने शेजारच्या रहिवाशांनी त्यांच्याशी संपर्क करून याबाबत कळविले. अदिती वडितके यांनी समक्ष फ्लॅटमध्ये येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून एक तोळ्याचे मिनी गंठण, सोन्याची चेन, चार तोळे वजनाच्या दोन पळ्या व सोन्याचा पट्टा असलेले मोठे गंठण तसेच 1 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. याबाबत खबर मिळताच श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. कॉम्प्लेक्समधील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून तपासकाम सुरू आहे. यासंदर्भात आदिती वडितके यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 550/ 2022 भारतीय दंड विधान कलम 457, 454, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com