कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीची 15 व्या वित्त आयोगातून 59 लाखांची कामे मार्गी

कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीची 15 व्या वित्त आयोगातून 59 लाखांची कामे मार्गी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

सरत्या वर्षाला निरोप देत असताना कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या यावर्षीच्या विविध विकासकामांचा मागोवा घेतला असता 15 व्या वित्त आयोगाच्या 2020-21 या आर्थिक वर्षातील जवळपास 59 लाख रुपयांची विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांनी दिली.

यामध्ये प्रामुख्याने कोल्हार बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते झुंबरलाल कुंकूलोळ कॉम्प्लेक्सपर्यंत 3 लक्ष रुपये खर्चून बंदिस्त गटार करण्यात आली. तसेच 7 लाख रुपये खर्चून बेलापूर रोडलगत राऊत वस्ती ते शहानगर बंदिस्त गटार करण्यात आली. गावांतर्गत आरसीसी पाईप गटार दुरुस्ती करणेकामी 2 लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय डॉ. काळे हॉस्पिटल ते राजुरी रस्त्यापर्यंत बंदिस्त गटार करण्यात आली असून त्याकरिता 5 लक्ष रुपये खर्च करण्यात आले.

कोल्हार पोलीस चौकीलगतच्या रस्त्याचे अडीच लाख रुपये खर्चून काँक्रिटीकरण करण्यात आले. याशिवाय गावांतर्गत एकनाथनगरमध्ये साडेतीन लाख रुपये खर्च करून रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आला. याखेरीज गावांतर्गत जेथे आवश्यकता आहे तेथील रस्त्यांचे 4 लक्ष रुपये खर्चून मुरमीकरण करण्यात आले.

गौतमनगर येथे विंधन विहिरीमध्ये 7.5 अश्वशक्तीचे सौरऊर्जा पंप बसविण्यात आले. याकरिता 5 लाख रुपये खर्च करण्यात आले. येथील हरी हाउसिंग सोसायटीमध्ये 5 लक्ष रुपये खर्चून अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आरओ आणि आर ओ प्लँट बसविण्यात आला असून त्याकरिता 5 लाख रुपये खर्च आला. त्याचप्रमाणे प्रवरानगर वसाहतीमध्ये आर. ओ. शेडसह आर. ओ. प्लँट उभारणीचे काम पूर्णत्वाला जात आहे. याकरिता 5 लक्ष रुपये खर्च करण्यात आले. कोल्हार बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात 4 लक्ष रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. गौतमनगर येथे 5 लाख रुपये खर्चून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून अन्य ठिकाणी 3 लक्ष रुपये खर्चून स्वच्छतागृह बांधण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांनी दिली.

गावामध्ये करण्यात येणारी विकास कामे ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सरपंच निवेदिता बोरुडे, उपसरपंच सविता खर्डे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने कोल्हार बुद्रुक येथे विकासकामे सुरू असून बरीच कामे पूर्ण झाली आहेत. प्रस्तावित महत्त्वाच्या कामांपैकी भविष्यात येथील नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर नवीन गाळे उभारण्यासंदर्भात मोठ्या स्वरुपाची दोन कामे करावयाची आहेत.

- अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, माजी सरपंच कोल्हार बुद्रुक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com