ट्रॅफीकमुळे कोल्हारचा पूल सदा न् कदा जाम

ट्रॅफीकमुळे कोल्हारचा पूल सदा न् कदा जाम

कोल्हार | Kolhar

राहाता तालुक्यातील कोल्हारच्या पुलाची बारमाही समस्या म्हणजे ट्रॅफीक जाम...गेल्या कित्येक वर्षापासूनची ही व्यथा. प्रतिदिन ही कथा प्रत्येकाची मुखी नित्याची. मात्र अद्याप यावर तोडगा काही निघालेला नाही. भिजत पडलेल्या घोंगड्याप्रमाणे हा प्रश्न निकाली निघत नाही. पर्यायाने प्रवाशांची आणि येथील ग्रामस्थांची डोकेदुखी काही संपत नाही. यावर कायमस्वरूपी तत्काळ इलाज व्हावा ही काळाची गरज बनली आहे.

कधी पुलावरील खड्डे या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात तर कधी ऊस वाहतुकीची साधने. कधी सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापूरला येणार्‍या भाविकांची वाढलेली गर्दी कारणीभूत ठरते तर कधी वाहनचालकांचा बेशिस्तपणा. कारणे कोणतीही असोत समस्या मात्र ठरलेली, ती म्हणजे ट्रॅफीक जामचा खेळखंडोबा. आणि तीही दररोजची. या रोजच्या होणार्‍या वाहतूक कोंडीला ग्रामस्थ वैतागले आहेत. यामुळे महामार्गावरील प्रवाशांचीच नव्हे तर स्थानिकांचीदेखील घुसमट होत आहे.

कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर आणि कोल्हार खुर्द या तीन गावांशी निगडीत असलेला हा प्रवरा नदीपत्रावरील पूल. उत्तर आणि दक्षिणेकडील असंख्य तालुक्यांना, जिल्ह्यांना आणि राज्यांना जोडणारा हा महत्वाचा दुवा. नगर मनमाड महामार्गावर असल्याकारणाने वाहनांची वर्दळ प्रचंड. शिर्डी शनी शिंगणापूर या दोन आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रांचा मध्यवर्ती पूल. या अनेक अर्थांनी या पुलाचे महत्व अनन्यसाधारण ठरते. परंतु त्याच्या नशिबी कायमची वाहतूक कोंडी ठरलेली. ही समस्या आता येथील रहिवाशांच्या अंगवळणी पडू लागल्यागत झाले आहे.

मागच्या गुरुवारी या पुलावर ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा अ‍ॅक्सल तुटून ट्रॉली उलटल्याने तब्बल चार तास वाहतूक खोळंबली. वाहनांच्या दुतर्फा लांबचलांब रांगा लागल्या. स्थानिक तरुणांच्या अथक प्रयत्नानंतर सदर ट्रॉली बाजूला करण्यात आली. त्यापश्यात वाहतूक सुरळीत झाली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी आणखी एका उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची हीच गत झाली. फक्त फरक इतकाच झाला की हा प्रकार पुलावर न होता पुलाच्या थोडासा पुढे मार्केट यार्डसमोर झाला.

पुलावरील खड्ड्यांची सध्या तत्पुरची डागडुजी झाली. त्यामुळे थोडे ठिक नाहीतर पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये बिघाड होणे, अ‍ॅक्सल तुटणे, पाटे तुटणे, चाक निखळणे, पंक्चर होणे हे प्रकार नित्याचेच घडतात. या कारणास्तव पुन्हा पुन्हा वाहतूक कोंडी होते. आणि एकदा का वाहतूक कोंडी झाली की मग ती पुन्हा सुरळीत होता होता नाकीनऊ येते. यात वेळ खर्ची पडतो तो भाग वेगळाच. अगदी काही मिनिटांकरिता जरी या पुलावर वाहतूक खोळंबली तरीदेखील अल्पावधीतच वाहनांच्या दूर अंतरापर्यंत रांगा लागतात. कारण या महामार्गावर असणारी भरमसाठ वर्दळ.

काही दिवसांपूर्वीपर्यंत या पुलाला समांतर एक जुना पूल होता. अवजड वाहतुकीसाठी बंद केलेल्या या जुन्या पुलावरून पादचारी, दुचाकी वाहने, शाळकरी मुले, बाजारकरू यांची ये जा करण्यासाठी चागली सोय होती. मात्र महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराने रस्त्याच्या कामात तो जुना पूल पाडून टाकला. त्यामुळे मोठी कुचंबना झाली. आता सरसकट सर्वांनाच नव्या पुलाचा आसरा राहिल्याने यावरून ये जा करावी लागते.

सततच्या होणार्‍या वाहतूक कोंडीचा परिणाम येथील बाजारपेठेवर होतो. याकडेदेखील गांभीर्याने पाहणे इष्ट ठरेल. ग्रामस्थांसाठी ही समस्या डोकेदुखी न राहता जीवघेणी बनलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या या समस्येला कायमचे तडीपार करणे आगत्याचे बनले आहे. या प्रश्नाला वैतागलेल्या ग्रामस्थांचा संताप अनावर होऊ पाहत आहे. संबधित विभाग कुठपर्यंत याकडे डोळेझाक करणार आहे देव जाणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com