कोल्हार भगवतीपूरचा आठवडे बाजार मूळ जागी भरला

अन पुलाची कोंडीतून सुटका झाली
कोल्हार भगवतीपूरचा आठवडे बाजार मूळ जागी भरला

कोल्हार (संजय कोळसे)

कोविड रुग्णांची घटती संख्या लक्षात घेऊन कोल्हार भगवतीपूरच्या दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारास परवानगी देण्यात आली. गेल्या आठवड्यापासून येथील बाजारतळावर आठवडे बाजार भरू लागला आणि पर्यायी जागा म्हणून कोल्हारच्या जुन्या पुलावर अनधिकृत भरणाऱ्या बाजारापासून व गर्दीपासून पुलाची कोंडीतून सुटका झाली.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अनेक दिवसांपासून कोल्हार भगवतीपूरच्या आठवडे बाजारास प्रतिबंध करण्यात आला होता. येथे शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये निव्वळ कोल्हार भगवतीपूरचेच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकही भाजीपाला खरेदी विक्रीसाठी येत असतात. या सर्वांची मोठी गैरसोय झाली. यावर भाजीपाला व अन्य विक्रेत्यांनी नामी शक्कल लढविली. येथील प्रवरा नदीपात्रावरील जुन्या पुलावर विक्रेते भाजीपाला विक्री करण्याकरिता बसू लागले. अनेक आठवडे हाच प्रकार सुरू होता.

मुद्दा असा की, कोल्हार-भगवतीपूर हे राहाता तालुक्यातील गाव आणि कोल्हार खुर्द हे राहुरी तालुक्यातील गाव. दोन्ही वेगवेगळ्या तालुक्यांतील गावांच्या मध्यावर नदीपात्रावर पूल असल्याने हा बाजार कुणाच्या हद्दीत भरला हा प्रश्न अनुत्तरीत बनला. पर्यायाने याला अटकाव कोणी करायचा हा मोठा पेच होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाबरोबरच जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबंधित खात्याने व अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल कानाडोळा केला. हीच संधी विक्रेते व बाजारकरूंच्या पथ्यावर पडली. दर शुक्रवारी येथील जुना पूल बाजारकरुंच्या गर्दीने कोंडीत सापडला.

यानिमित्ताने आणखी एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो की, कोविड संक्रमण रोखण्यासाठी बाजारतळावर आठवडे बाजार भरविण्यात परवानगी नाकारण्यात येत होती. मात्र पुलावर बिनबोभाट बाजार भरला जायचा. मग तेथे पुलावर करोनाचा प्रादूर्भाव किंवा संक्रमण होत नव्हते का? की निव्वळ बाजारतळावर बाजार भरल्यावरच करोना प्रादूर्भाव होतो? असा उपहासात्मक सवाल अनेकांच्या मनात डोकावत होता. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजावणार कोण?

याचा गैरफायदाही अनेकांनी घेतला. तो असा की, पुलावर भरणाऱ्या बाजारामध्ये भाजीपाला व अन्य मालाची किंमत अव्वाच्या सव्वा घेतली जायची अशी अनेकांची ओरड होती. विशेषतः गृहिणींची. मनाला वाटेल त्या भावात माल विकला जायचा. सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः गृहिणींना पर्याय नसल्याने भाजीपाला खरेदी करणे अटळ होते.

असो एकदाचा गेल्या आठवड्यापासून कोल्हार भगवतीपूरचा आठवडे बाजार त्याच्या मूळ जागी म्हणजेच बाजारतळावर नियमित भरू लागला आणि ग्रामस्थांनी एक प्रकारे सुटकेचा निःश्वास सोडला. निव्वळ ग्रामस्थांनीच नव्हे तर नदीपात्रावरील पुलानेही सुटकेचा निःश्वास सोडला असावा असे म्हणावे लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com