कोल्हार |वार्ताहर| Kolhar

आजूबाजूच्या गावात बरोबरच कोल्हार भगवतीपूरमध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 3 दिवसांचा कडक जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय

स्वयंस्फूर्तीने एकमुखाने व्यापार्यांनी घेतला. शुक्रवार दि. 26 मार्च ते रविवार दिनांक 28 मार्च या कालावधीत कोल्हार भगवतीपुरमध्ये हा कर्फ्यू लागू होईल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी दिसल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशी माहिती कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी दिली.

राहाता तालुक्यातील शिर्डी, राहाता, लोणी बुद्रुक व लोणी खुर्द आदी गावांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हार भगवतीपूरमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. करोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन करणे अपरिहार्य बनले असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती.

त्या अनुषंगाने कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूरची संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली. बैठकीस व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दोन्ही गावांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगून प्रत्येकाने वैयक्तिकरित्या खबरदारी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. वयोवृद्धांना आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असून करोना रुग्णांनी आपल्याशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी करोनाबाबत उद्भवलेल्या परिस्थितीवर व्यापार्यांना काय निर्णय घ्यायचा याबाबत विचारणा केली असता, यावर सर्वानुमते शुक्रवार, शनिवार, रविवार असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात फक्त दवाखाने आणि औषधांची दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. भाजीपाला व फळविक्रेते यांची देखील दुकाने बंद राहतील. सदर तीन दिवसांच्या काळात कुणाचेही दुकान अथवा व्यवसाय सुरु ठेवल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. शुक्रवारी कोल्हार भगवतीपूरचा आठवडे बाजार बंद राहणार आहे. वरील निर्णय करोना साखळी तोडण्यासाठी घ्यावा लागत असल्याचे अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी सांगितले.

याप्रसंगी कोल्हार बुद्रुकच्या सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, गोरक्षनाथ खर्डे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खर्डे, उपाध्यक्ष अनिल बांगरे, अनिल हिरानंदानी, खजिनदार राजेंद्र खर्डे, व्यापारी पतसंस्थेचे संजय शिंगवी, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच व्यापारी उपस्थित होते.