कोल्हारचा-बेलापूर रस्ता कचरामुक्तीसाठी ग्रामपंचायतची वाटचाल

कोल्हारचा-बेलापूर रस्ता कचरामुक्तीसाठी ग्रामपंचायतची वाटचाल

कोल्हार |वार्ताहर| Kolahar

कोल्हार बुदुक गावातील बेलापूर रस्त्यालगत रहिवाशांकडून फेकल्या जाणार्‍या कचर्‍याची समस्या मोठी डोकेदुखी बनली होती. कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने अशा कचर्‍याच्या ठिकाणांवर स्वच्छता केली. तेथे मुरूम टाकला. नागरिकांनी कचरा ग्रामपंचायतच्या घंटागाडीमध्येच टाकण्याचे आवाहन केले. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याची माहिती कोल्हार ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे व ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांनी दिली.

कोल्हार बुद्रुक येथील बेलापूर रस्त्यालगत ठिकठिकाणी स्थानिक रहिवाशांना कचरा टाकण्याकरिता ग्रामपंचायतने मोठमोठ्या आकाराच्या लोखंडी कुंड्या ठेवल्या होत्या. मात्र कचरा कुंड्यांमध्ये कमी आणि कुंड्याबाहेर अधिक असे चित्र दिसायचे. पर्यायाने रस्त्यालगत कचरा साचायचा. त्यामुळे अशा ठिकाणी मोकाट जनावरे, डुकरे यांचा वावर वाढला. आजूबाजूला कचर्‍याची दुर्गंधी पसरायची. येथून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना नाकाला रुमाल लावून पुढे जावे लागायचे.

बेलापूर रोडलगत दत्तनगर, झुंबरलाल कुंकुलोळ कॉम्प्लेक्सजवळ, संभाजीनगर, शिवाजीनगर, लक्ष्मीबाई कुंकुलोळ मार्केटजवळ काही ठराविक ठिकाणी कचर्‍याची समस्या तीव्र बनली. कचरा कुंड्या असूनही त्याचा फारसा उपयोग होत नव्हता.

यावर उपाय म्हणून कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने या रस्त्यालगतच्या सर्व कचरा कुंड्या काढून टाकल्या. जेथे घाणीचे साम्राज्य होते तेथे स्वच्छता करून मुरूम टाकला. बेलापूर रस्त्यालगत संपूर्ण बंदिस्त गटार केल्यामुळे त्याचाही फायदा झाला. या भागामध्ये रिक्षा फिरवून कचरा दररोज येणार्‍या घंटागाडीमध्ये टाकण्याचे आवाहन केले. कचरा उघड्यावर टाकल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल असे फलक काही ठिकाणी लावले. रस्त्यालगत यापूर्वीच वृक्षारोपण केलेले आहे.

तीन महिन्यांपासून बेलापूर रोडलगत सुरु केलेल्या या सर्व उपाययोजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. लक्ष्मीबाई कुंकुलोळ मार्केटजवळ रस्त्यालगत औदुंबराचे झाड लावलेले आहे. तेथे स्वच्छता करून मुरूम टाकण्यात आला. याचा परिणामस्वरूप तेथे औदुंबराची पूजा होऊ लागली असल्याचे अमोल खर्डे व शशिकांत चौरे यांनी सांगितले.

नागरिकांचे सहकार्य महत्वाचे...

स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या तरी कधीकधी काही मोजक्या लोकांकडून या स्वच्छतेला हरताळ फासण्याचा प्रयत्न होतांना दिसतो. अजूनही काही मंडळी रात्रीच्या अंधारात या ठिकाणी रस्त्यालगत कचरा फेकतांना आढळतात. अशा प्रकारे कचरा केल्याने आपल्याच निवासस्थानाजवळचा परिसर घाणेरडा दिसतो. दुर्गंधीचा सामना आपल्याबरोबर आसपासच्या सर्वांना करावा लागतो. याचा कदाचित विसर पडला असेल. नागरिकांचे संपूर्ण सहकार्य असल्याशिवाय स्वच्छता मोहीम कुचकामी ठरू शकते.

Related Stories

No stories found.