कोल्हारमध्ये मोकाट भटकणार्‍यांची अँन्टीजन रॅपिड टेस्ट

कोल्हारमध्ये मोकाट भटकणार्‍यांची अँन्टीजन रॅपिड टेस्ट

प्रशासकीय यंत्रणा ऍक्टिव्ह ; बेजबाबदार भटकणारे धास्तावले

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

नियम कडक करूनही बेजबाबदार नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणा तसेच महसूल विभाग आता अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आले.

कोल्हार भगवतीपूरमध्ये विनाकारण मोकाट फिरणार्‍यांवर आता कारवाईचा बडगा अन रस्त्यातच अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यास प्रारंभ झाला आहे. पॉझीटिव्ह निघणार्‍या रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोणी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील यांनी दिली.

करोनाचा कहर दिवसागणिक नवा उच्चांक गाठत आहे. या महामारीने अनेकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे. शासनाकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही नागरिक सुधारायला तयार नाहीत. मृत्यूचे भयच त्यांना राहिलेले नसल्याने जनता कर्फ्यूमध्ये रस्त्यावर होणार्‍या गर्दीवरून दिसत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर ग्रामपंचायत, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी पोलीस आणि तलाठी यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून रस्त्यावर मोकाट भटकणार्‍यांवर अंकुश लावला जात आहे. कोल्हार-बेलापूर रस्त्यावर लोणी पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची जागेवरच अँटिजेंन रॅपिड चाचणी करण्यात येत होती. ज्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह येतील आशा नागरिकांना थेट अ‍ॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

त्यामुळे रस्त्यावर भटकंती करणार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे. यावेळी नगर-मनमाड रस्ता, बेलापूर चौक येथे नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत होती. सदर कारवाईत लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी, कोल्हार प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप, ग्रामसेवक शशिकांत चौरे, तलाठी सुरेखा अबुज, सहाय्यक फौजदार लबडे, पो. हे. कॉ. राजेंद्र औटी, पो. हे. कॉ. आव्हाड, पो. ना. शिवाजी नर्‍हे व कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

नाकाबंदीमध्ये भटकणार्‍यांना पोलिसांनी अडवून अँटिजेन टेस्ट करायला सांगताच अनेकांनी त्यास विरोध केला तर काही महाभाग भांडण करून हमरीतुमरीवर आले. काही जण विना नंबर प्लेटची दुचाकी वाहने दामटत होती. काही महाभाग आयकार्ड दाखवीत अथवा अत्यावश्यक सेवा असे बोर्ड लावून फिरत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com