कोळगाव येथे मंदिरासह दोन दुकाने फोडली

चोरट्यांकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास
कोळगाव येथे मंदिरासह दोन दुकाने फोडली

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील कोळगाव येथे शनिवारी अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी एकाच रात्रीत कोळाई देवीचे मंदिर, कोळगाव फाट्यावरील बियर शॉप, आणि किराणा दुकानाचे शटर तोडून रोख रकमेसह सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळगाव चे आराध्य दैवत श्री कोळाईदेवी मंदिरात शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिराची दानपेटी चोरुन नेली. या दान पेटीत सुमारे 4 हजार रुपये होते, तर त्या नंतर मंदिराच्या पायथ्याशी बाळासाहेब कोल्हे यांच्या संत कृपा या किराणा दुकानाचे शटरचे कोंडे तोडून दुकानातील 15 ते 20 हजार रुपयांचे किराणा सामान चोरुन नेला. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नगर दौंड महामार्गावर दीपक नलगे यांच्या मालकीच्या असलेल्या बियर शॉपीकडे वळवला.

शॉपीचे शटर उचकटून आतील विविध कंपन्यांचे 80 हजार ते एक लाख रुपये किमतीचे बियरचे सुमारे 15 ते 20 बॉक्स चोरुन नेत एकाच रात्री तीन ठिकाणी चोर्‍या करून सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या बाबत बेल वंडी पोलिस ठाण्यात मंदिराचे पुजारी राजेंद्र गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत डॉगस्कोड आणि ठसे तज्ञांना पाचारण करत पुढील तपास सुरू केला.कोळगाव परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोर्‍यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com