कोल्हार बुद्रूक तलाठी कार्यालयाचा निधी जागेअभावी मागे जाणार?

कोल्हार बुद्रूक तलाठी कार्यालयाचा निधी जागेअभावी मागे जाणार?

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक येथेनवीन तलाठी कार्यालय उभारण्याकरिता जवळपास 27 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र गावठाणात मोकळी जागा शिल्लक नसल्याने बांधकाम सुरु करता येईना. पर्यायाने निधी परत मागे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वीही या कार्यालयासाठीचा निधी दोन वेळेस मागे गेलेला आहे. कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देण्यासाठी संभाव्य जागेच्या शोधात आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

शासकीय निर्देशांनुसार सदर तलाठी कार्यालय उभारणीकरिता किमान 3 गुंठे जागाउपलब्ध होणे अनिवार्य आहे. कोल्हार बुद्रुक येथे नूतन तलाठी कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नाशिक आयुक्त कार्यालयाकडून यंदा जवळपास 27 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जाईल. काम सुरु होण्यासाठी अगोदर त्यासाठी जागा हवी आहे. महसूल विभागाने कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतकडे जागा मागितली. परंतु गावठाणात एवढी मोकळी जागा शिल्लक नाही. जागेविना प्रश्न प्रलंबित राहिला. यापार्श्वभूमीवर निधी परत मागे जाण्याची संभावना असू शकते. कारण यापूर्वीही कार्यालयासाठीचा निधी दोन वेळेस मागे गेलेला आहे. ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी मिळून जागा उपलब्ध करून देण्याकामी तात्काळ जलदगतीने पावले उचलणे अत्यावश्यक बनले आहे.

जागा उपलब्ध व्हावी याकरिता कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात वेगवेगळ्या ठिकाणी चाचपणी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु आहे. मात्र अद्यापि त्यात यश प्राप्त झाले नाही. सद्यस्थितीत कोल्हार बुद्रुक तलाठी कार्यालयाचे कामकाज कोल्हार बुद्रुक सोसायटीच्या एका छोट्याशा खोलीतून केले जाते. ही जागा अपुरी पडते. यापूर्वी बरेच दिवस कोल्हार बुद्रुक ग्रामसदनमध्ये असलेल्या जागेतूनकामकाज सुरू होते. परंतु तेथेही जागा अपुरी ठरत होती.

तलाठी कार्यालय हे महसूल विभागाचे गावपातळीवरील प्रत्यक्ष लोकांशीप्रामुख्याने शेतकर्‍यांशी थेट संपर्क असलेले महत्त्वाचे ठिकाण.शेती, नैसर्गिक आपत्ती, शेत जमिनीअथवा अन्य जागांसंबंधी सर्व कामे, उत्पन्नाचे दाखले आदि विविधांगी कामे तलाठी कार्यालयातून पार पडतात. गावपातळीवरील महत्त्वाचे शासकीय कार्यालय म्हणून तलाठी कार्यालयाकडे आवर्जून पाहिले जाते. मात्रजागेची अडचण असल्याने कोल्हार बुद्रुक येथे हक्काचे नवीन तलाठी कार्यालयअद्यापि उभे राहू शकले नाही.

राहाता तालुक्यात 29 पैकी 26 गावांमध्ये नूतन तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे. कोल्हार बुद्रुक, साकुरी आणि जळगाव या तीनच गावात जागेअभावी काम राहिले. निधीच्या उपलब्धतेपेक्षा जागेचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. कोल्हार बुद्रुक येथे जुने शासकीय गोडाऊन आहे. ते पाडून तेथे कार्यालय करता येऊ शकते. मात्र गोडाऊन पडण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यामध्ये भरपूर वेळ खर्च होईल. त्यादरम्यान आलेला निधी मागे जाण्याची संभावना आहे. म्हणून महसूल विभागाने ग्रामपंचायतकडे जागा उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे.

- अशोक रंधे, नायब तहसीलदार, राहाता.

कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने काही वर्षांपूर्वी पोलिस चौकीसाठी 20 गुंठे जागा दिलेली आहे. आता त्या जागेचे मोजमाप करायला सांगितले आहे. तेथे 20 गुंठ्यापेक्षा जास्त जागा निघाल्यास उर्वरित जागा उपलब्ध करून देऊ. मागे काही महिन्यांपूर्वी येथील प्राथमिक शाळेजवळ कार्यालय करण्याबाबत आपण सुचविले होते. ती जागा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची आहे. ती महसूल विभागाकडे वर्ग करावी लागणार होती. मात्र महसूल विभागाने त्यासंबधी कागदोपत्री पाठपुरावा न केल्याने तो विषय तसाच मागे पडला. गावात इतर ठिकाणी जागा आहे, परंतु अपेक्षित 3 गुंठे जागा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

- अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, माजी सरपंच, कोल्हार बुद्रुक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com