
कोकणगाव |वार्ताहर| Kokangav
कोकणगाव संगमनेर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्या कोकणगाव-मनोली रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गाने प्रवास करणार्या नागरिकांना मोठ्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. तरी सदर रस्ता संबंधीत विभागाने खडीकरण व डांबरीकरण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेली दोन वर्षापासून कोकणगावकडून मनोली, रहिमपूर, मनोली, ओझर, उंबरीबाळापूर, आश्वी अशा गावांना जाणार्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पंचक्रोशीतील गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने वाहनाची मोठी वर्दळ असते. मनोली-कोकणगाव हा रस्ता संगमनेरला जाण्यासाठी सोपा असल्याने या मार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते.
सध्या साखर कारखाने सुरु झाल्याने ऊस वाहतुकीचे साधने देखील याच रस्त्याने जातात. रस्ता खड्डेमय झाल्याने त्यातच दुतर्फा काटेरी झाडे वाढल्याने अनेकवेळा छोटे-मोठे अपघातही होतात. वाहनधारकांना या रस्त्याने जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. तरी रस्त्याचे त्वरीत रुंदीकरण करुन खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कोकणगाव, मनोली, रहिमपूर, ओझर, उंबरीबाळापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.