
कोकणगाव |वार्ताहर| Kokangav
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘लुंबानी’ बौद्ध विहारला 1 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता अचानक आग लागली. या आगीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व प्रतिमा जळून खाक झाल्याची घटना घडली.
सकाळी कोकणगाव येथील काही तरुण बौद्ध विहार येथे आले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर ते तरुण पुणे येथे भिमा कोरेगाव येथे रवाना झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने अचानक बौद्ध विहारमधून धुर येत असल्याचे काही नागरीकांच्या लक्षात आले. त्यानंतर काही तरुणांनी सदर आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
मात्र बौद्ध विहारला कुलुप लावले असल्याने व त्याची चावी कोरेगाव येथे गेलेल्या तरुणांकडे असल्याने आग विझविण्यासाठी मोठी अडचण येत होती. सदर आगीत विहारमधील फोटो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जळून खाक झाला. या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार आहेर, घोलप यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर सदर बौद्द विहाराची स्वच्छता करण्यात आली.