कोकमठाण शिवार पावसाच्या पाण्याखाली पिके सडली

संपूर्ण नुकसान भरपाईची रक्ताटेंची मागणी
कोकमठाण शिवार पावसाच्या पाण्याखाली पिके सडली

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गेल्या सहा दिवसापासून सलग पाऊस पडत असल्याने तालुक्यातील कोकमठाण गावचा संपूर्ण शिवार पावसाच्या पाण्याने तुडूंब भरला असून शेतातील सोयाबीन, मका, घास आदी सर्वच पिके सडून गेली आहेत, याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी केली आहे.

शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शासन यंत्रणेस याची माहिती देऊन भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे, असेही ते म्हणाले. कोकमठाण शिवारात सध्या नागपूर-मुंबई समृध्दी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य शेतकर्‍यांच्या शेतातील पाणी निचरा होऊन जाण्यात आडकाठी निर्माण झाल्या आहेत. संबंधित शेतकर्‍यांनी समृध्दी महामार्गाचे प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार या यंत्रणेस याबाबतची वेळोवेळी माहिती देऊनही त्यात कुठल्याही सुधारणा झाल्या नाहीत.

सप्टेंबर महिन्यात गेल्या सहा दिवसांपासून या परिसरात जोराचा पाऊस कोसळत आहे. शेतात गुडघ्याच्या पुढे पाणी साठले आहे. कोकमठाण गावचा संपूर्ण परिसर बाधित झालेला आहे. गावचे तलाठी फक्त पाहून गेले, पण शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तहसीलदार विजय बोरूडे यांनाही याबाबतची कल्पना दिली आहे.

चालू वर्षी शेतकर्‍यांच्या हातून खरिपाची पिके वाया गेली. पिके सडल्याने उत्पन्न मिळणार नाही. खरिपासाठी घेतलेले कर्ज, बँकांकडून आणलेले पैसे, पत्नीचे दागिने गहाण ठेवून उपलब्ध केलेल्या पैशाची परतफेड होऊच शकणार नाही. परिणामी त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. ते कशानेही भरून येणार नाही. सतत पडत असलेल्या पावसामुळे पशुधनाचेही हाल होत आहेत. सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकर्‍यांना नुकसानीचे सध्याचे निकष बाजूला ठेवून आर्थिक मदत करावी जेणेकरून रब्बी पीक लागवडीसाठी शेतकर्‍यांना त्याचा हातभार लागेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही कोकमठाणच्या शेतकर्‍यांना आधार द्यावा, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com