कोकमठाण अखंड हरिनाम सप्ताहाची लगबग !

लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सप्ताहस्थळ सज्ज
कोकमठाण अखंड हरिनाम सप्ताहाची लगबग !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या दरम्यान होत असलेल्या सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या विविध मंडपांची, रस्ते उभारणी, भटारखान्यातील चुल्हांगणे, कीर्तन प्रवचनाचे व्यासपीठ याच्या उभारणीची लगबग सुरू आहे. सप्ताह काळात सप्ताह स्थळाला पंढरीचे स्वरुप येणार असल्याने सप्ताहस्थळाला आता लाखो भाविकांची आस लागून आहे.

कोकमठाण पंचक्रोशी आणि सप्ताह समिती भाविकांच्या सोयी सुविधेसाठी आहोरात्र झटत आहेत. सदगुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या सप्ताहाला पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. हा सप्ताह अखंडपणे सुरू आहे. मध्यंतरी दोन वर्ष करोनाने सप्ताह सराला बेटावरच पण साध्या पध्दतीने करण्यात आले. आता करोनानंतर पहिलाच सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण येथे होत आहे. कोकमठाण शिवारात परंतु नगर मनमाड हायवे लगत जंगली महाराज आश्रमाच्या जवळच विस्तीर्ण परिसरात सप्ताहाचे स्थळ आहे. सप्ताह समिती मागील काही दिवसांपासून या सप्ताहाची जोरदार तयारी करत आहे.

प्रवचन किर्तनासाठी विस्तीर्ण मैदान तयार करण्यात आले आहे. मध्यंतरी सलग बुरबूर पावसाने हे मैदान हिरवळीने नटले असल्याने तो परिसर कमालीचा प्रसन्न वाटत आहे. नगर मनमाड हायवे पासून काही मिटर अंतरावर प्रहरा मंडप उभारला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रहरा मंडपासमोर धर्मध्वज उंचावर मोठ्या दिमाखात फडकत आहे. त्याजवळच महंत रामगिरी महाराजांची कुटीया उभारणी अंतिम टप्प्प्यात आहे. प्रहरा मंडपात सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने हा परिसर सात दिवस अखंड भजनाने दुमदूमून जाणार आहे. सप्ताहाचा परिसर जमिनीचे क्षेत्र आहे. सप्ताहा समितीने त्या परिसरात रस्ते उभारले आहेत. पाऊस आला तर चिखल होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

भटारखान्याची लगबग !

या प्रहरा मंडपाच्या उत्तरेला काही अंतरावर महाप्रसाद तयार करण्यासाठी भटारखाना उभारण्याची लगबग सुरू आहे. यासाठी खास शामियाना उभारण्यात आला आहे. त्यात आमटी बनविण्यासाठी 40 भट्ट्यांची उभारणी करण्यात येत आहे. आमटी भाकरी हे सप्ताहाचे वैशिष्ट्य असल्याने व सप्ताहातील आमटीची चव भाविकांनी आकर्षूण घेते. या भट्ट्याच्या शेजारी महाप्रसादाची बुंदी बनविण्यासाठी 20 भट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. अशा 60 भट्ट्यांची सोय करण्यात आली आहे. सप्ताहाच्या आदल्या दिवशी पासूनच महाप्रसादाची बुंदी बनविण्यास प्रारंभ होणार आहे. साधरणत: 400 पोती साखरेची बुंदी बनविण्यात येणार आहेत. तर 600 पोती चिवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढप्यांचे नियोजन सप्ताह समितीने केले आहे. महाप्रसाद वाटपासाठी 500 ट्रॅक्टरचे नियोजन सप्ताह समितीने केले आहे. या सप्ताहाकाळात पाऊस आला तर भाविकांच्या पंगतीला अडचण येऊ नये म्हणून सप्ताह समितीने दोन भव्य शामियाने उभारले आहेत. अशी सोय पहिल्यांदाच कोकमठाण सप्ताहात करण्यात आली आहे. भाविकांना शुध्द पाणी देण्यात येणार आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अन्य प्रदर्शनाचे सप्ताहा समितीने नियोजन केले आहे. यासाठी खास शामियान्यांची उभारणी करण्यात आली आहे. या सप्ताह निमित्ताने एसजेएस हॉस्पिटलच्यावतीने व अन्य रुग्णालयाच्यावतीने भाविकांना मोफत वैद्यकिय तपासणी पथकांची आखणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com