चाकूहल्ला करणार्या प्राध्यापकास चार दिवस पोलीस कोठडी
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पत्नी, पोलिसासह दोघांवर चाकूहल्ला करून खुनाचा प्रयत्न करणार्या प्रा.विनोद मच्छिंद्र बर्डे (रा. चितळी, ता. श्रीरामपूर (मूळ रा. गारगोटी जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोमवारी बर्डे याने आपल्या पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात दुपारी 2.15 च्या सुमारास पोलिसांसह दोघांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस कर्मचारी संतोष रामकिसन बडे (नेमणूक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरून प्रा. विनोद मच्छिंद्र बर्डे याच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलीसात भादंवि कलम 307, 353, 332, 506 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी बडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी बर्डे दुपारी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आला. यावेळी त्याने जोरजोरात आरडाओरडा करून साक्षिदार किशोर शिवाजी शिंदे यांच्यावर त्याच्या जवळील चाकूने वार केला. ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. आडांगळे यांना मारण्यासाठी अंगावर धावला. त्याला धरण्यासाठी मी गेलो असता माझ्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले.
या घटनेत दोघे जखमी झाले. जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उप अधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक सानप पुढील तपास करीत आहेत. आरोपी प्राध्यापकास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 27 मे पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.