सराईत गुन्हेगार पठारेसह साथीदार पसारच

सुडके मळ्यातील चाकू हल्ला प्रकरण
सराईत गुन्हेगार पठारेसह साथीदार पसारच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय पठारे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यांच्या शोधासाठी तोफखाना पोलिसांनी तात्पुरती डिबी स्थापन केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पठारे याचा साथीदार संतोष नवगिरे याला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे.

19 मे रोजी दिनेश मनोहर पंडित हे त्यांच्या सिध्दार्थनगरमधील सुडके मळ्यात घरासमोर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या विजय राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर), संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारेचा एक मित्र यांनी पंडित यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर विजय पठारे याने त्याच्याकडील चाकूने पंडित यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. यापूर्वी देखील पठारे टोळीने बालिकाश्रम रोडवर दोन दुकानावर दरोडा टाकला होता. पोलीस पठारेच्या मागावर आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली असून पठारे व त्याच्या अन्य साथीदारांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आरोपी पठारेच्या मागावर आमचे पोलीस आहेत. तात्पुरती डिबी स्थापन केली आहे. कामगिरी दाखवली तर त्याच कर्मचार्‍यांना डिबीत घेतले जाईल. सध्या या डिबी पथकाला पठारे व त्याच्या साथीदारांना अटक करण्याचे काम दिले आहे.

- सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक, तोफखाना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com