विखे-कर्डिले दिल्ली दरबारी !
सार्वमत

विखे-कर्डिले दिल्ली दरबारी !

के.के.रेंज : भाजप शिष्टमंडळाने घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील 23 गावातील हजारो शेतकर्‍यांचा प्रश्न असलेल्या लष्काराच्या के.के. रेंज विस्तारिकरणाला विरोध करण्यासाठी भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील, राहुरीचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवीदिल्ली येथे संरक्षण राजनाथ सिंग यांची भेट घेतली.

तसेच लष्कराच्या विस्तारिकरणामुळे तीन तालुक्यांतील हजारो शतकर्‍यांच्या शेतीसोबत अन्य गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला आहे.

दोन दिवसांपूर्वी राहुरी व पारनेर तालुक्यात लष्करी अधिकार्‍यांनी के.के.रेंजसाठी केलेल्या सर्वेक्षणामुळे अस्वस्थ झालेल्या हजारो शेतकर्‍यांच्या भावना केंद्र सरकारचे प्रतिनिधी असणारे आणि संरक्षण मंत्री सिंग यांच्या कानावर घालण्यात आल्या. आधीच राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी मुळा धरण, कृषी विद्यापीठ नगर-मनमाड हायवे, यासह अन्य प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर सरकारने अधिग्रहीत केलेले आहेत.

आता लष्काराच्या के. के. रेंज आर-2 साठी अतिरिक्त एक लाख एकर जमिनीची अधिग्रहित होणार असल्याची माहिती पसरली आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील शेतकरी प्रचंड हवालदिल आहेत.

ब्रिटिश कालीन असलेल्या के.के.रेंज साठी यापूर्वीच 1946 आणि 1956 मध्ये भूसंपादन झालेले असताना लष्कराच्या सरावासाठी अतिरिक्त एक लाख एकर क्षेत्र रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 1980पासून याबाबतची अधिसूचना दर पाच वर्षांनी प्रसिद्ध केली जाते. मात्र, सुमारे 40 वर्षापर्यंत शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारचा नुकसान भरपाई दिली गेली नाही.

केंद्र सरकारने विविध शहरात लष्कराची जमीन राज्य सरकारला यापूर्वीच हस्तांतरित केलेली असल्यामुळे राज्य सरकारने याबाबत भूमिका घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याबाबत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. भाजप शिष्टमंडळाने याबाबत संरक्षण मंत्री यांचे लक्ष वेधले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राज्य सरकारशी समन्वय साधत या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळ राज्य सरकारला देखील भेटणार असून राज्य सरकारकडून याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही, तोपर्यंत लष्करी कवायती व लष्करांचे सर्वेक्षण स्थगित करण्याची विनंती सुद्धा शिष्टमंडळाने संरक्षणमंत्र्यांना केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com