के.के.रेंजच्या जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध करणार- ना. तनपुरे

के.के.रेंजच्या जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध करणार- ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

के. के. रेंजसाठी आपल्या व पारनेर मतदारसंघातील जमीन अधिग्रहित करण्यास या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपला तीव्र विरोध असून राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्यापर्यंत याबाबत लोकांच्या तीव्र भावना पोहोचविलेल्या आहेत. लवकरच खासदार पवार यांच्यासमवेत आपण स्वतः आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे आदींसह केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर दिल्ली येथे जाणार असल्याची माहिती ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

के. के. रेंज भूमिअधिग्रहण संदर्भात होत असलेल्या हालचाली व याबाबतची लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका स्पष्ट करण्यासाठी ना. तनपुरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. संरक्षण खात्याने या भागातील सर्वेक्षण नव्याने सुरू केलेले लोकांच्या नजरेस येत असून साहजिकच लोकांमध्ये घबराट पसरली आहे. संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत एक-दोन दिवसांत बैठक घेऊन प्रक्रियेबाबत माहिती घेणार आहोत.

तालुक्यातील मुळा धरणासाठी याच भागातील जनतेने याआधी मोठा त्रास सहन केला असून त्यांची शेती पूर्णपणे विस्थापित झालेली आहे. वावरथ जांभळी व इतर गावांतील लोकांनी जवळपास एका पिढीने विस्थापितांचे जीवन व्यतीत केले आहे. मोठ्या कष्टाने येथील जनतेने या जिरायत जमीन सपाटीकरण, पाईपलाईन करून बागायती केल्या असताना आता पुन्हा टांगती तलवार या जनतेवर आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

राजकारणाच्या वेळी राजकारण केले जाईल, परंतु आपण स्वतः तसेच भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे त्यांच्या बाजूने प्रयत्न करीत असताना सर्वजण तेथील लोकांबरोबर आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण विरहित एकत्रितपणे भूमिका घेण्याची आपली मानसिकता कायम आहे.

जमीन अधिग्रहण करण्यात येत असल्याने जिल्ह्याला वरदान ठरलेल्या धरणालाही धोका पोहोचू शकतो. यासाठी इतर ठिकाणी जिरायत भागात मोठे क्षेत्र लष्कराने ताब्यात घेण्याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. तनपुरे म्हणाले, संरक्षण खात्यात केंद्र शासनाकडे निर्णय असल्याने केंद्रानेही आता जय जवान जय किसान या नार्‍याप्रमाणे संरक्षणाला महत्त्व देतानाच शेतकर्‍यालाही बाधा पोहोचू नये, अशी भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण याबाबत कायमच लोकप्रतिनिधी म्हणून शेतकर्‍यांबरोबर असून या अधिग्रहणाला विरोध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, संदीप पानसंबळ, धीरज पानसंबळ आदी उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com