सर्वेक्षणासाठी लष्करी अधिकार्‍यांचा मोर्चा राहुरीकडे
सार्वमत

सर्वेक्षणासाठी लष्करी अधिकार्‍यांचा मोर्चा राहुरीकडे

12 गावांमध्ये अद्ययावत नकाशासाठी युद्धपातळीवर सर्वेक्षण

Arvind Arkhade

राहुरी |प्रतिनिधी| rahuri

पारनेरनंतर आता राहुरी तालुक्यातील 12 गावांमध्ये लष्करी अधिकार्‍यांद्वारे अद्ययावत नकाशा करण्यासाठी युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे 12 गावांतील व तालुक्यातील नागरिक, ग्रामस्थांच्या पोटात गोळा उठला आहे. त्यामुळे आता के. के. रेंजचा विस्तारीकरणाचा तिढा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

सन 1956 साली खारे कर्जुने भागात भारतीय लष्कराने सुमारे 40 हजार हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करून के.के.रेंज या नावाने युद्धसराव केंद्र सुरू केले. भारतीय लष्करातील सर्व प्रकारच्या रणगाड्यांद्वारे युद्ध सरावाचे सैनिकांना प्रशिक्षण दिले जाते.

1980 झाली या भागातील युद्ध सरावासाठी आणखी भूसंपादनाची गरज वाढल्याने नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांतील 23 गावांतील 25 हजार हेक्टर क्षेत्र अधिग्रहणाला सुरुवात झाली. तर 2005 साली या सर्व भागात रेडझोन घोषित केला गेला.

के.के. रेंज-2 साठी या भागातील विस्तारीकरणासाठी भारतीय लष्कराच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. मागील वर्षी पारनेरमधील पाच गावे नगर तालुक्यातील सहा गावे तर सर्वाधिक 13 राहुरी तालुक्यातील गावांमधील सर्व महसूली, वनजमिनी, जंगल, जलसंपदा, रहिवासी क्षेत्र यांच्या मालमत्तांचे मूल्यांकन प्रशासनाच्या मार्फत केले गेले. आता भारतीय लष्कराच्या या हालचाली वाढल्या आहेत.

सध्या राहुरी तालुक्यातील 13 गावात लष्करी जवानांच्या पथकामार्फत गावांच्या सीमा, रस्ते, मोक्याची ठिकाणे, घरे, यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांचा परिपूर्ण नकाशा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय लवकरच हेलिकॉप्टरमधून हवाई सर्व्हेक्षण करण्यात येऊन नकाशावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

मात्र, याला या जवानांच्या पथकाकडून ग्रामस्थांना कोणतीही माहिती देण्यास येत नसल्याने ग्रामस्थांमधील संभ्रम शिगेला पोहोचला आहे. या गावांमध्ये सर्वे सुरू आहे, असे उत्तर दिले जाते. सध्या कुरणवाडी, चिंचाळे, म्हैसगावकडील गावांचा सर्वे सुरू झाला आहे.

हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर नगरच्या लष्करी विभागाकडून आर्मीच्या मुख्यालयाला अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत असल्यामुळे आता पुढे काय होणार ? या शंकेमुळे ग्रामस्थांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेच्या मुळा धरण क्षेत्रातील गावात हा सर्वे करण्यात येत असल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातही याची चर्चा वाढली असून चिंतेत भर पडली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com