के.के.रेंजच्या विस्तारिकरणासाठी लष्कराकडून पाहणी

ग्रामस्थांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण । जिल्हा प्रशासन अनभिज्ञ, जनआंदोलनासंदर्भात आज बैठक
के.के.रेंजच्या विस्तारिकरणासाठी लष्कराकडून पाहणी

पारनेर|प्रतिनिधी|Parner

पारनेर तालुक्यातील के. के. रेंजच्या आर-2 सुरक्षा क्षेत्रामध्ये तालुक्यातील 5 गावे येत आहेत. आजही या क्षेत्रावर के.के. रेंजची टांगती तलवार आहे. सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी रविवारी या गावांची पाहणी केल्याने गावकरी पुन्हा धास्तावले आहेत.

दरम्यान, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विसर पडताच पुन्हा के.के. रेंजच्या आर-2 सुरक्षा क्षेत्राच्या विस्तारिकरणाचा प्रयत्न सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात रविवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता, लष्कराने याबाबत काहीही कळविले नसल्याचे सांगण्यात आले.

पारनेर तालुक्यातील वडगाव, सावताळ, गाजीपूर आणि पळशी या गावांत काल रविवारी (दि.9) लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देऊन प्रत्यक्षात भौगोलीक पाहणी केली. याबाबत येथील नागरिकांना स्थानिक महसूल आणि ग्रामविकास यंत्रणेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना नव्हती. यावेळी संबंधीत गावच्या सरपंचांनी विचारणा केल्यानंतर त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.

लष्कराचे अधिकारी गावात आल्यानंतर नागरिक त्यांच्या अवतीभवती जमा झाल्यानंतर लष्करी अधिकार्‍यांनी चर्चा करणे टाळले. यामुळे एकीकडे करोनाचे संकट असताना आता रेंजच्या विस्तारीकरणाच्या भितीची टांगती तलवार आली आहे. यासंदर्भात आ. नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती वनकुटे सरपंच राहुल झावरे यांनी दिली आहे. तसेच के.के. रेंज बाबतीत संघर्ष सुरूच ठेवणार आहे. लोकांनी घाबरू नये, वेळप्रसंगी जनआंदोलन उभे असे सरपंच झावरे यांनी म्हटले आहे.

राहुरी, नगर अन् पारनेरच्या 23 गावांचा समावेश

के.के.रेंज क्षेत्र आर-2 सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील 5, राहुरी तालुक्यातील 12 गावांचा तर नगर तालुक्यातील 6 गावांचा सहभाग आहे. एकूण 23 गावांवर के.के. रेंज क्षेत्राची टांगती तलवार आहे. दरवर्षी लष्कराकडून के.के. रेंजच्य आर-2 विस्तारिकरणाचा प्रयत्न होतो. या विरोधात जनतेचा विरोध उभा राहताच प्रकरण शांत केले जाते.

राहुरी तालुक्यात सर्वाधिक

के.के. रेंजच्या आर-2 विस्तारिकरणात सर्वाधिक क्षेत्र राहुरी तालुक्यातील आहे. तालुक्यातील 12 गावांसह उत्तर नगर जिल्ह्याला वरदान असणारे मुळा धरण के.के. रेंजच्या विस्तारिकरणात लष्कराच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डीच्या काही भागातील शेती, नगर शहराचा, एमआयडीसीच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

23 गावांतील मालमत्तेचे मुल्यांकन

जमिनीचे अधिग्रहण होणार की नाही याबाबत ग्रामस्थांना ठोस उत्तर मिळत नाही. राजकीय नेते अधिग्रहण होणार नसल्याचे सांगत आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच सैन्य दलाने 23 गावांतील मालमत्तेचे मुल्यांकन करून घेतले. त्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये असलेल्या उच्च प्रतीच्या मालमत्तेचा तपशील महसूल विभागाकडून घेतला. यानंतर सैन्य दलाची वाहने संबंधित गावामध्ये पाहणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांना के.के.रेंजच्या विस्ताराला विरोध करणारे संबंधित गावांच्या ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत. करोना काळामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट झाली नाही. मात्र, पुन्हा खा. पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाईल. परिसरातील शेतकर्‍यांची एक इंचही जमिन के.के.रेंजला मिळणार नाही.

- आ. निलेश लंके

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com