
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मकरसंक्रातीच्या दिवशीच (रविवारी) सायंकाळी मंगलगेट परिसरासह घासगल्ली, दाणेडबरा, एसटी कर्मचारी वसाहत परिसरात दोन समाजाच्या गटात तुफान दगडफेक झाली. पतंगोत्सवादरम्यान लावण्यात आलेली गाणी, ढोल ताशे व झेंड्यावरून दुपारपासूनच दोन गटात कुरबुरी सुरू होत्या व त्याचेच पर्यवसान दगडफेकीत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या दगडफेकीत चार वाहनांचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोन संशयतांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरात रविवारी दिवसभर मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा झाला. सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंगलगेट परिसरात अचानक दगडफेक सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यामुळे जमावाने पळ काढला. तोफखाना, भिंगार, नगर तालुका पोलीस ठाण्यांची पथके व तेथील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शीघ्र कृतिदल, दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या परिसरात पोलिसांकडून तपासणीही सुरू करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, तोफखानाच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, नगर तालुक्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.