दूध आंदोलन आणखी तीव्र करणार- किसानसभा
सार्वमत

दूध आंदोलन आणखी तीव्र करणार- किसानसभा

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधाला किमान 30 रुपये दर या प्रमुख मागाणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन पूर्वी शेतकर्‍यांना गायीच्या दुधासाठी 30 ते 35 रुपये प्रति लिटर दर मिळत होता. आज परिस्थिती काही प्रमाणात पूर्व पदावर येऊन सुध्दा शेतकर्‍यांना दुधासाठी केवळ 17 रुपये प्रति लिटर दर दिला जात आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दिला जाणारा हा दर अत्यंत तोकडा आहे. सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी 10 लाख लिटर दुध खरेदी करून यापासून पावडर बनविण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र हा निर्णय केवळ मोजक्या सहकारी संघांना लागू करण्यात आला होता. राज्यात एकूण दूध संकलनापैकी 78 टक्के दूध संकलित करणार्‍या खाजगी संघ व कंपन्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. परिणामी राज्यातील केवळ 12 तालुक्यातील शेतकर्‍यांनाच या योजनेचा अंशतः लाभ मिळाला. अटी व शर्तीमुळे 10 लाख लिटर पैकी प्रतिदिन केवळ निम्मेच दूध सरकार खरेदी करू शकले. सरकारच्या अशा अपुर्‍या व पक्षपाती हस्तक्षेपामुळे शेतकर्‍यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा या प्रश्नावर गेली महिनाभर विविध मार्गाने सरकारचे लक्ष वेधत होती. राज्यातील विविध शेतकरी नेते व संघटनाही या प्रश्नावर सक्रिय होत्या. सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, किसान सभा व दुध संघाची एकत्र बैठक 21 जुलै रोजी आयोजित केली आहे.

मात्र ही बैठकांमध्ये वेळ वाया घालवण्याची वेळ नाही. सरकारला प्रश्न माहीत आहे. प्रति लिटर 10 रुपये अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केल्यास शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. बैठकांमध्ये वेळ वाया घळविण्याऐवजी 10 रुपये प्रति लिटर थेट अनुदानाची सरकारने घोषणा करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.

दूध उत्पादक पट्ट्यात तहसील कार्यालयांना निवेदने, दूध संकल केंद्रावर दुग्धाभिषेक, तहसीलदारांमार्फत सरकारला दूध भेट या मार्गाने सध्या शेतकरी आंदोलनाची तयारी करत आहेत. सरकारने प्रश्नाबाबत रास्त तोडगा न काढल्यास समविचारी संघटनांच्या बरोबरीने आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा किसान सभेचे नेते डॉ.अशोक ढवळे,जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com