दूध दर प्रश्‍नी किसान सभेचे लोकप्रतिनिधी संपर्क अभियान

दूध दर प्रश्‍नी किसान सभेचे लोकप्रतिनिधी संपर्क अभियान

अकोले (प्रतिनिधी) / Akole - दुधाला किमान 35 रुपये दर मिळावा व दूध क्षेत्रातील लूटमार थांबवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरींग चे धोरण लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभा संघर्ष करत आहे. सदरच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी मंत्रालयात बैठक घेऊन दूध उत्पादकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अद्याप यानुसार दूध खरेदीचे दर (milk price) वाढविण्यात आलेले नाहीत. अशा पार्श्‍वभूमीवर किसान सभेने पुन्हा एकदा दूध उत्पादकांच्या मागण्या धसास लावण्यासाठी जोरदार अभियान सुरू केले आहे.

दूध उत्पादकांच्या मागण्या येत्या अधिवेशनामध्ये मांडण्यात याव्यात यासाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभरातील सर्व आमदारांना दूध उत्पादकांचे निवेदन मेल करण्यात आले आहे. ठिकठिकाणी आमदारांना भेटून हे निवेदन प्रत्यक्षात देण्यात येत आहे. आमदार विनोद निकोले यांच्यामार्फत राज्यातील सर्व मंत्री, सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांना प्रत्यक्ष भेटून दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील लोकप्रतिनिधींनी दूध उत्पादकांच्या मागण्या समजून घेऊन त्या सभागृहात ठामपणाने मांडाव्यात, राज्य सरकारच्यावतीने मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिलेला शब्द पाळावा, दुधाला किमान 35 रुपये दर द्यावा, शेतकर्‍यांची लूटमार थांबवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे, खाजगी व सहकारी दूध क्षेत्राला लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे लोकप्रतिनिधी संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात दुधाचे दर पाडल्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी या काळात दूध घातलेल्या शेतकर्‍यांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावे, अशा प्रकारची मागणीही या अभियानात किसान सभेच्या वतीने डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com