हॉटेल व्यावसायिक तरुणाचे अपहरण करुन चेहऱ्यावर ब्लेडने वार!

पाण्यात बूडवून मारण्याचा प्रयत्न; १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
हॉटेल व्यावसायिक तरुणाचे अपहरण करुन चेहऱ्यावर ब्लेडने वार!

पारनेर (प्रतिनिधी)

पप्या सिनारे व त्याने पळवून नेलेली मुलगी कोठे आहे, याची माहिती दे अशी धमकी देत तालुक्यातील भनगडेवाडी फाटा येथील हॉटेल व्यवसायिक आक्रोश बाबाजी ठोकळ (वय २२) या तरूणाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडचे वार, पाण्यात तोंड बुडवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तसेच त्याला लाकडाचा ओंडका, लाकडी दांडा आणि काळया रंगाच्या पाईपनेही बेदम मारहाण केल्याप्रकरणी पारनेर येथील एका महिलेसह १४ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी जबर दुखापत पोहचविणे, खून करण्यासाठी अपहरण करणे आदी कलामांन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. आरोपींपैकी काहींना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात ठोकळ याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश संतोष सुंबे, सुरज दावभट दोघेही (रा. पाडळी कान्हूर), रोहित पोपट औटी, सुनील पोपट औटी, विनायक सोनवणे, अनिल राठोड, लता पोपट औटी, अविनाश नवनाथ दरेकर, वैभव औटी, शुभम विधाटे, राहूल बबन औटी, बापू लक्ष्मण गंधाडे (सर्व रा. पारनेर), अनिकेत उर्फ सोन्या गवळी (रा. शहजापूर), अक्षय भरत रोकडे (रा. वडनेर हवेली) यांनी दि. २९ ला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील आक्रोश याच्या हॉटेलवरून त्याचे अपहरण केले.

पारनेर येथील वरखेड मळ्यातील सुनील औटी याच्या पोल्ट्रीवर नेण्यात येऊन पप्या सिनारे व त्याने पळवून नेलेली मुलगी कोठे आहे, याची विचारणा सर्वजण आक्रोश याच्याकडे करू लागले. त्याच वेळी अनिकेत गवळी याने जवळ पडलेला लाकडी ओंडका उचलून आक्रोश याच्या डोक्यात घातला. जोराचा प्रहार झाल्याने आक्रोश यास चक्कर येउन तो कोसळला.

त्यानंतर शुभम विधाटे याने गालावर ब्लेडने वार करून सांगतो की नाही अशी वारंवार विचारणा केली. त्याच वेळी सुनील व रोहित औटी यांनी पाठीमागून येत जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये आक्रोश याचे तोंड दाबून धरले. श्वास कोंडल्याने आक्रोश हातपाय खोडू लागल्यानंतर त्यांनी त्यास सोडले. त्यानंतर लगेच काळ्या रंगाचा पाईप तसेच लाकडी दांडक्याने आक्रोश यास बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मारहाण सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचे वाहन सायरन वाजवत वरखेड मळ्याच्या दिशेने येत होते. ते पाहून या इसमांनी आक्रोश यास स्विफट कार क्र. एम. एच. ०४ सी. टी. ८८२९ मध्ये कोंबले.

पप्याचा ठावठिकाणा लागला नाही, तर तुला माळशेज घाटात नेऊन मारून टाकणार आहे, अशी धमकी ते देत होते. ओतूर टोलनाका जि. पुणे येथून शिरूरमध्ये आक्रोश यास आणण्यात आले. त्यांच्या वाहनाचा पोलिसांचे वाहनही पाठलाग करीत होते. वाहनाचा वेग वाढवून पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश यास सुपा (ता. पारनेर) येथील टोलनाक्यावर सोडून देण्यात आले. प्रवासादरम्यानही आक्रोश यास बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या आक्रोश याने सावरत पारनेर पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन काही आरोपींना अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.