
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तीन वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा (वय 10) शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांना यश आले आहे. पीडित मुलीला सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सुपा पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला असता मुलीचा शोध न लागल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सदरचा गुन्हा तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत होते.
तपास सुरू असता सदरची मुलगी नगर शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत असून ती तिच्या मामाकडे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे, अंमलदार समीर सय्यद, अनिता पवार, काळे यांनी संबंधित विद्यालयात जाऊन मुलीचा शोध घेतला. ती मिळून आल्याने तिला ताब्यात घेत सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.