
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी तालुक्यातील खुडसरगांव शिवारातील शिवरस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. आता तर ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे जिकरीचे झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती न करता थेट नवीन रस्ताच तयार करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
खुडसरगांव शिवरस्ता हा शेतीपुरक दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती अवजारे शेतात नेणं हे तर मोठं आव्हानात्मक असते. या रस्त्याअभावी परिसरातील अनेक शेतकर्यांचा ऊस देखील तोडीविना तसाचा उभा आहे. आमदार लहू कानडे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून देखील या समस्येकडे कोणीही दखल घेतली नाही.
लोकप्रतिनिधींनी तात्काळ या समस्यांची दखल घेऊन हा रस्ता तयार करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गणेश पवार, अप्पासाहेब पवार, अभिमन्यू निशाणे, सुभाष देठे, आबासाहेब पवार, सतीश पवार, ज्ञानेश्वर निशाणे, दादासाहेब निशाणे, प्रदीप पवार, परिगाबाई शेळके, मंदाकिनी शिंदे, भिमा निशाणे, मिनाबाई निशाणे, शांतीलाल देठे, बापूसाहेब पवार, सोपान निशाणे, पुंजाहरी देठे, दत्तात्रय देठे आदींसह परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे.
पावसाळ्यात दररोज शेतात कामधंदा करण्यासाठी जावे लागते. तसेच आमच्या माणसांना मुलामुलींना शाळेत सोडविण्यासाठी जावे लागते. त्यामुळे मायबाप सरकारने आमचा विचार करून आमचा मार्ग मोकळा करून द्यावा, ही विनंती आहे.
- परिगाबाई शेळके, शेतकरी महिला खुडसरगांव
राहुरी पंचायत समितीचे ब्राह्मणी गटाचे सदस्य महेश सूर्यवंशी यांच्यामार्फत खुडसरगाव रस्त्याच्या संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. ते आल्यावर ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याचे काम लवकरच मार्ग लावू.
- रावसाहेब बोरडे, ग्रामसेवक खुडसरगांव.
सुमारे पाच किलोमीटर अंतर रस्त्याच्या संदर्भात आमदार लहू कानडे, भाऊसाहेब कांबळे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी करुनही अद्याप रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. मात्र, आमदार कानडे यांच्यामार्फत एक किलोमीटर खडीकरण रस्त्याचे काम दिले होते. परंतु एक किलोमीटर काहीच होत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती न करता नवीन रस्ता करून द्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
- गणेश पवार, खुडसरगांव