कोल्हारमध्ये आणखी ३ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस हस्तगत

५ आरोपींना अटक, एकाच आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई
कोल्हारमध्ये आणखी ३ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस हस्तगत

कोल्हार | वार्ताहर

कोल्हार बुद्रुक येथे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आलेले आणखी ३ गावठी कट्टे व ३ जिवंत काडतुसांसह पाच जणांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ५ दिवसांपूर्वी कोल्हारमध्ये ३ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या एकाच आठवड्याच्या आतमध्ये येथे आणखी ३ गावठी कट्टे हस्तगत करण्यात आल्याने कोल्हार परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक केलेल्यांमध्ये दोन कोल्हार, दोन श्रीरामपूर व एक शिबलापूर येथील इसमांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारांबाबत माहिती घेत असतांना कोल्हार बुद्रुक येथे काही इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त खबऱ्याकडून नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार यांचे पथक नेमून कारवाई करण्याची सूचना दिली.

नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.फौ. मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, संदिप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संदिप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोकॉ रणजीत जाधव, चापोहेकॉ संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांच्या पथकाने दुपारच्या सुमारास कोल्हार येथील गौतमनगर भागात चिंचेच्या झाडाजवळ सापळा रचला. ४ ते ५ संशयित इसम आढळून आले. संशयितांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना ते पळून जाऊ लागले. पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दुर्गेश बापू शिंदे ( वय ३५ ), रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर, हारूण उर्फ राजू रशीद शेख ( वय ३१ ) रा. अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूर, अश्पाक उर्फ मुन्ना रफीक पटेल ( वय २१ ), रा. बेलापूर रोड, कोल्हार बुद्रुक, प्रसन्न विलास लोखंडे ( वय ३२ ), रा. गौतमनगर, कोल्हार बुद्रुक, सदानंद राजेंद्र मनतोडे ( वय २७ ), रा. शिबलापूर, ता. संगमनेर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या अंगझडतीमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतुसे मिळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. अधिक सखोल तपास केला असता सदर गावठी कट्टे व काडतूस हे विक्रीकरिता आणल्याचे त्यांनी सांगितले. पंचासमक्ष हत्यारे जप्त करण्यात आले.त्यांच्याकडून एकूण ९१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संदिप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६२०/ २०२२ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा नोंदिविण्यात आला आहे. अटक केलेल्यांपैकी दुर्गेश बापू शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे, नाशिक, जालना, सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत व आर्म अॅक्ट प्रमाणे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्यातील आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात तो फरार आहे. प्रसन्न विलास लोखंडे याच्याविरुद्ध राहुरी व लोणी पोलिस स्टेशनला खून व आर्म अॅक्टप्रमाणे एकूण २ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या धाडीमध्ये कोल्हार येथे एका आठवड्यात अश्या प्रकारच्या लागोपाठ दोन कारवाया झाल्या. या दोन्ही कारवाया मिळून एकूण ६ गावठी कट्टे आणि ९ जिवंत काडतुसे हस्तगत झाले. या दोन्ही घटना गंभीर असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com