
कोल्हार | वार्ताहर
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील भाऊसाहेब नगर मधील एका घरास शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण प्रपंच या आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे.
कोल्हार खुर्द येथील भाऊसाहेब नगर येथे संतोष धोंडीराम सोनवणे यांचे पत्र्याचे घर असून काल दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरास आग लागल्याचे तेथील रहिवाशांच्या ध्यानात आले. संतोष सोनवणे हे त्यांच्या सासुरवाडीला मुंबई येथे एक कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांचे वडील होते
परंतु हेही शुक्रवारी बाजारसाठी गेल्याने घरी कुणीच नव्हते. दुपारी आग लागून घरातून धूर बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी धावपळ करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु उन्हाच्या तडाख्यात आग नियंत्रनात न आल्याने संपूर्ण साहित्य त्यात फ्रीज, मोठा एल.इ.डी टी व्ही, कपाट तसेच इतर संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले.
सोनवणे यांचा मंडपचा व्यवसाय असल्याने ते साहित्य ही त्या ठिकाणी होते. ते जाळून खाक झाले. या आगीत जवळपास तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. या आगीचे स्पष्ट कारण मात्र समजू शकले नाही.
घटनास्थळी कामगार तलाठी मछिंद्र राहणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक शिरसाठ, गोपीनाथ दळे यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.