खोकर शिवारात वादळाने 23 विजेचे खांब पडले

शेतकर्‍याचे 22 पत्रे उडाले, कपाशी, कडवळ व ऊस भुईसपाट
खोकर शिवारात वादळाने 23 विजेचे खांब पडले

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर व भोकर परिसरात शनिवारी झालेल्या वादळात अनेक फळझाडांसह वृक्ष उन्मळून पडले. खोकर कारेगाव रोडलगत अनेक ठिकाणी वीज वाहक तारा घरावर व घरासमोर तुटून पडल्या. वादळात सुमारे 23 विजेचे खांब पडले तर एका घराचे 22 पत्रे उडून लांब जाऊन पडले. वादळाने ऊस, मका, कडवळ व कपाशीची पिके झोपल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने परीसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने अनर्थ टळला.

खोकर-कारेगाव रोडलगत शनिवार दि. 10 सप्टेंबरच्या रात्री अचानक ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट व मुसळधार पावसाबरोबरच वादळ झाले. खोकर गावापासून दक्षीणेकडील परिसर व काही प्रमाणात कारेगाव शिवाराला त्याची मोठी झळ बसली. खोकर शिवारातील तारामती बाळासाहेब काळे याचे घरासमोरील विजेचा खांब त्यांच्या दारासमोर उभ्या असलेल्या पिकअप गाडीजवळ येऊन पडला.

अशोक बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब काळे व अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांच्याही घरासमोरील विजेचा खांब पडला तर वीजवाहक तारा घरांवर पडल्या. दैव बलवत्तर म्हणून वीजपुरवठा खंडित होता त्यामुळे अनर्थ टळला. याच परीसरात बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. याचा त्रास हरेगाव येथील मतमाऊली यात्रेकरूंना झाला. रात्री उशीरापर्यंत परिसरातील युवक यात्रेकरूंना अंधारातून वाट काढून देत होते.

वादळात सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश पवार यांची दोन एकर कपाशी व दत्तात्रय भोंडगे यांची दोन एकर कपाशी भुईसपाट झाली. झुंबर तुकाराम कणगरे यांच्या घरासमोरील पडवीचे 22 पत्रे उडून सुमारे शंभर फूट लांब जाऊन पडले, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. कारेगाव शिवारातील हरिभाऊ वंजारी यांची दोन एकर व कोंडीराम वंजारी यांचे दीड एकर कपाशीचे नुकसान झाले. कालव्याच्या दुतर्फा झाडे पडल्याने कडेचा रस्ताही वाहतुकीस बंद पडला होता. काँग्रेसचे तालुका संघटक आबासाहेब पवार यांचे वस्तीवरही अनेक झाडे उन्मळून पडली. या परिसरात नारळाची झाडेही उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी नारळांचा सडा पडलेला दिसला.

वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांना लागलीच पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

दररोजच्या पावसाने सोयाबीनच्या नुकसानीची भीती

खोकर, भोकर व कारेगाव परिसरात दरोजच्या पावसाने घासावर परीणाम झाल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. रोजच्या पावसाने शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले असून जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाने उघडीप दिली नाही तर सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. आताच्या वातावरणात अनेक ठिकाणी सोयाबीन अति पाण्यामुळे पिवळे पडण्यास सुरूवात झाली असून त्यावर फवारणी करण्यात शेतकर्‍यांच्या नाकी दम आल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com