खोकर सोसायटीत आज मतदान

खोकर सोसायटीत आज मतदान

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या खोकर विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत आज गुरूवार दि. 28 एप्रिल रोजी मतदान होत आहे. येथे सत्ताधारी पोपटराव जाधव यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडी विरूद्ध अशोकचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर काळे यांचे नेतृत्वाखालील लोकसेवा मंडळ अशी सरळ दुरंगी लढत होत आहे. येथे माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाचे अशोक कारखान्याचे आजी माजी संचालकांच्या अंतर्गत गटात चुरशीची लढाई होत आहे त्यात महाविकास आघाडीला करण ससाणे गट साथ देत आहेत.

खोकर विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ निवडणुकीत 13 जागांसाठी आज दि.28 एप्रील रोजी मतदान होत आहे. 919 सभासदांपैकी 689 सभासद मतदानास पात्र आहेत. येथे सत्ताधारी अशोकचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतून सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून पोपटराव जाधव, बाबासाहेब पटारे, दिलावर पठाण, भिमबाई पवार, उत्तम पुंड, रेवननाथ भणगे, बाळासाहेब सलालकर, शिवाजी सलालकर हे निवडणूक लढवित आहेत तर अनुसचीत जाती-जमाती मतदार संघातून मथुराबाई चक्रनारायण, महिला राखीव मतदार संघातून सुशिला गव्हाणे व प्रयागाबाई भणगे तर इतर मागास वर्गीय मतदार संघातून सुकदेव सिन्नरकर व भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघातून तुकाराम कुसेकर हे निवडणूक लढवित आहेत.

तर विरोधी असलेले अशोकचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर काळे यांचे लोकसेवा मंडळाकडून सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून संजय काळे, अशोक कोल्हे, केशव चव्हाण, प्रकाश पवार, प्रमोद शेरकर, सागर शेरकर, कादर सय्यद, नंदकुमार सलालकर हे तर अनुसूचीत जाती-जमाती मतदार संघातून विमल चक्रनारायण, महिला राखीव मतदार संघातून रेखा पटारे, शुभांगी भणगे, इतर मागास वर्गीय राखीव मतदार संघातून भाऊसाहेब शिन्नरकर, भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीव मतदार संघातून बाबासाहेब कचरे हे निवडणूक लढवित आहेत.

येथील काँग्रेसचे प्रदेश महासचीव करण ससाणे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीपासून पोपटराव जाधव यांचेशी केलेली युती अभेद राहिल्याने येथे ससाणे गट पोपटराव जाधव यांना साथ देत आहेत तर आ. लहु कानडे यांचेसह सेनेच्या गटानेही अलीप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याने या निवडणुकीचे बाहेर असलेले तिसरी आघाडी, आ. कानडे गट व सेना काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संदिपकुमार रूद्राक्ष हे काम पाहत आहेत, त्यांना सोसायटीचे सचिव कृष्ण शिंदे व भाऊसाहेब चव्हाण हे काम पाहत आहेत. येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय येथे आज दि.28 एप्रील रोजी सकाळी 8 ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होत आहे त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.